सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
फळे उत्तम आरोग्यासाठी नेहमीच उपयुक्त असतात. फळे केवळ बाहेरून त्वचेलाच नव्हे तर आतून देखील शरीराला टवटवीत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. शिवाय आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडण्या देखील मदत करतात. हे सर्व गुणधर्म असलेले फळ म्हणजेच पिअर. याचे वैज्ञानिक नाव पायरस असून त्याला हिंदी व मराठी मध्ये नाशपती असे म्हणतात.
पिअर हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. नाशपती आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, के, खनिजे, पोटॅशियम, फिनोलिक संयुगे, फोलेट, फायबर, तांबे, मॅंगनीज, मॅग्नेशियम, तसेच सेंद्रिय संयुगे देखील पिअरमध्ये आढळतात. इतकेच नाही तर त्यातील बहुतांश फायबर पेक्टिनच्या स्वरूपात असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयविकाराच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरू शकते. पिअरमध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील खूप कमी असते. जे वजन कमी करण्यास मदत करू शकते. त्यात मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. तसेच, कर्करोगापासून दूर राहण्यासही हे एक उत्तम फळ आहे.
होमर ने इ.स.पूर्व ९व्या शतकात ‘द ओडिसी’ नावाचे महाकाव्य लिहिले. ज्यामध्ये त्यांनी पिअर किंवा नाशपाती यांना “देवाची भेट” म्हणून संबोधले. हे फळ प्राचीन ग्रीसमध्ये खूप लोकप्रिय होते, विशेषत: स्त्रियांमध्ये, ज्यांनी त्यांचे सौंदर्य राखण्यासाठी त्याचा वापर केला. पिअर तुमच्या त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि वजन संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पिअर तुमच्या त्वचेला विविध नुकसानांपासून वाचवते. त्याचबरोबर त्वचा टोन्ड राहते आणि सुरकुत्याही दूर होतात.
पिअर फळाचे अन्य फायदे असे
– पिअर मध्ये असलेले मोठ्या प्रमाणातील ग्लुकोज शरीरातील अशक्तपणा तात्काळ कमी करण्यास मदत करते.
– गरोदर स्त्रियांनी पिअर खाल्ल्यास त्यातील फॉलिक अॅसिड नवजात बालकाला जन्म दोषापासून दूर ठेवते. त्यामुळे गरोदर असताना स्त्रियांनी रोज एक पिअर खाणे फायद्याचे आहे.
– पिअरमध्ये थंडावा असल्यामुळे ताप कमी होण्यासही मदत होते.
– पिअरमध्ये असलेले क्षार कार्सिनोजेनिक पेशींना शरीरात पसरण्यासाठी थांबवते जेणेकरून आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यास मदत होते. मासिकपाळी बंद झालेल्या स्त्रियांनी दररोज एक पिअर खाल्ल्यास स्तन कर्करोगाचा धोका ३४ टक्क्यांनी कमी होतो.
– लठ्ठपणा ही आजच्या काळातील गंभीर समस्यांपैकी एक आहे. जर तुम्ही वाढलेल्या वजनाने हैराण असाल तर आहारात नाशपातीचा समावेश करा. नाशपातीमध्ये आढळणारे घटक वजन कमी करण्यास मदत करतात.