मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
शेंगदाणे म्हणजे गरीबांचे बदाम होय. प्रवासात शेंगदाणे सोबत बाळगले जातात. पण, ते केवळ प्रवासाचा टाईमपास नाहीत, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. पौष्टिकतेच्या बाबतीत अनेक जण शेंगदाणाला कमी लेखतात, परंतु ते अनेक महागड्या सुक्या फळांइतकेच आरोग्यदायी फायदे देतात. काही श्रीमंत नागरिक महागडे अक्रोड, काजू आणि बदाम खातात. अक्रोड हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. परंतु अनेक संशोधने असे सूचित करतात की, शेंगदाणे हृदयासाठी तितकेच फायदेशीर आहे. ते आपल्या कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. आणखी काही फायदे आणि मजेदार पाककृती येथे जाणून घ्या …
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. ते खाल्ल्याने तुमची पचनक्रिया योग्य राहते.
शेंगदाण्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यात चांगले फॅट्स देखील असतात. एवढेच नाही तर शेंगदाण्यात फोलेट, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम सारखे अनेक आवश्यक सूक्ष्म पोषक घटक देखील असतात.
वजन कमी करू इच्छिणारे बहुतेक नागरिक कर्बोदकांऐवजी प्रथिनयुक्त आहार घेतात. याचे कारण म्हणजे जास्त वेळ भूक लागत नाही आणि कॅलरीजही कमी असतात. काही अभ्यासातून हे समोर आले आहे की, जर आहारात शेंगदाण्यांचा समावेश केला तर त्यामुळे वजन वाढत नाही तर नियंत्रणात राहते.
जर वजन वाढवायचे असेल तर तुम्ही तुपात शेंगदाणे तळू शकता. तूप टाळत असाल तर कढईत फक्त शेंगदाणे भाजून घ्या. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, भुजिया, चाट मसाला, काळे मीठ आणि थोडा सॉस टाकून स्नॅक्स म्हणून खा.