पुणे – आजच्या धावपळीच्या आणि वेगवान जीवनशैलीत लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी देखील योग्य वेळ देता येत नाही. त्यात काही लोक त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात की, त्यांना स्वतःच्या आहाराची योग्य काळजी घेता येत नाही, त्यामुळे त्यांना अनेक रोग होण्याची शक्यता असते. परंतु आपल्याला निरोगी आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर आपण आपल्या अन्नाची म्हणजेच आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.
चांगल्या दिनचर्येचा अवलंब करून आपण स्वतःला निरोगी ठेवू शकतो. तरीही काही वेळा लोकांना अशक्तपणा येऊ लागतो, तसेच कधीकधी वेळेवर अन्न न खाल्याने अशक्तपणा सुरू होतो. याकरिता आपण आपला आहार योग्य आणि वेळेवर घेणे महत्वाचे आहे. यासाठी खारीक, खजूर आपण फक्त सकाळी रिकाम्या पोटी सेवन केले तर फायदा होतो. आता त्याच्या आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेऊ या ..
अशक्तपणा दूर
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता असते व अशक्तपणाची स्थिती निर्माण होते. तेव्हा खजूरांचे नियमित सेवन केले तर अशक्तपणा टाळू शकतो आणि शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊ शकते. कारण खजुरामध्ये जास्त प्रमाणात लोह आढळते.
आतड्यांतील जंतांसाठी प्रभावी
काही वेळा लहान मुले किंवा वृध्द लोकांच्या आतड्यात जंत येतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी जर सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर हे जंत नष्ट होण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त, आपले हृदय देखील खजूरांच्या सेवनाने मजबूत राहते.
बद्धकोष्ठता समस्या
पोटाच्या समस्या किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्यांनी आपण ग्रस्त असाल तर खजूर खाऊ शकतो. त्यातील फायबर बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर मात करण्यास, आतड्यांच्या योग्य हालचालींसाठी आणि आपली पाचन प्रणाली सुधारण्यास मदत करू शकते. म्हणून दररोज खजूर खाणे योग्य ठरते.
ताण तणावावर मात
खारीक आणि खजूर तणाव आणि अशक्तपणावर मात करण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका इत्यादींचा धोका कमी करण्यासाठीही खजूर फायदेशीर आहे.