मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आयुर्वेद शास्त्रात दुधाला अमृत म्हटले आहे तर दुधापासून तयार होणारे दही, तूप, लोणी, या पदार्थांना अमृताचे सार असे म्हटले आहे. यापैकीच तूप हा पदार्थ आहारात अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरणारा आहे. दररोज एक चमचा तूप खाल्ल्याने त्याचे खूप फायदे होतात असे म्हटले जाते.
तूप हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे आपल्या जेवणाची चव वाढते. आपण अनेकदा खिचडी आणि रोटीवर तूप खातो, त्यामुळे त्याची चव दुप्पट होते. तुपाचे सेवन केल्याने जेवणाची चव तर वाढतेच शिवाय अनेक आजारांवर उपचारही होतात.
बहुतांश जणांचा असा अविश्वास आहे की, तूप खाल्ल्याने वजन वाढते, परंतु तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट वजन कमी करण्यात प्रभावी आहे. तुपाचे सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होते आणि आरोग्य चांगले राहते.
तुपात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के आणि ई सारखे पोषक घटक असतात, ते आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. तसेच आयुर्वेदानुसार तुपाचे सेवन शरीरात औषधासारखे काम करते.
तणावपूर्ण जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, मानसिक व शारीरिक ताणतणाव आणि झोपेची कमतरता यामुळे आपली पचनक्रिया अनेकदा खराब होते. सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास पोटाचे आरोग्य सुधारते.
न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, आयुर्वेदानुसार तूप लहान आतड्याची शोषण क्षमता सुधारते आणि आम्लता कमी करते. चला जाणून घेऊ या सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तुपाचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात.
सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाण्याचे आरोग्य फायदे:
– सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पचनक्रिया स्वच्छ आणि निरोगी राहते.
– तुपाचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होते. रोज तुपाचे सेवन केल्यास त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसते.
– काही जणांना पोट साफ न होण्यास त्रास होतो, म्हणजेच त्यांना पुन्हा पुन्हा बाथरूममध्ये जावे लागते, त्यांची तुपामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.
– तूप खाल्ल्याने भूक शांत होते आणि वारंवार खावेसे वाटत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. तूप मर्यादित प्रमाणात सेवन करणे फायदेशीर आहे.
– तुपामध्ये हेल्दी फॅट असते, ते खराब फॅट काढून वजन कमी करण्यास मदत करते.
– त्यात आतड्यांसंबंधी अनुकूल एन्झाईम असतात, जे आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
– तुपाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, तरूण व लहान मुलांना तूप खाऊ घालणे खूप फायदेशीर आहे.