मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आहार, विहार, व्यायाम आणि निद्रा या मानवी जीवनासाठी आवश्यक गोष्टी मानलेल्या आहेत, दैनंदिन कामकाज करताना आपल्याला जसे अन्न म्हणजेच आहाराची गरज असते, तसेच रात्री वेळेवर झोपण्याची देखील आवश्यकता असते. किंबहुना मानवी जीवनासाठी नव्हे तर अन्य प्राण्यांसाठी देखील झोप आवश्यक मानली जाते. योग्य, वेळेवर व पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात
शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी म्हणजे आबालवृद्धांनी रात्री अखंड झोप घेणे आवश्यक असल्याचे विविध अभ्यासातून दिसून आले आहे. झोपेच्या दरम्यान, शरीरात काही हार्मोन्स स्रावित होतात जे चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक मानले जातात. पुरेशी झोप न मिळाल्याचा परिणाम थेट आपल्या कामकाजावर आणि आरोग्यावर होतो.
विशेषतः ज्यांना रात्री चांगली झोप मिळत नाही त्यांना चिडचिड, नैराश्य, तणाव यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका जास्त असतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, अनेकदा रात्री झोपण्यापूर्वी आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्याचा झोपेवर परिणाम तर होतोच पण त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊ…
रात्री ब्रश करा
आपण रात्रीच्या जेवणानंतर ब्रश करता का, नाही तर ही सवय तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. तज्ज्ञांनी दिवसातून दोनदा दात घासण्याची शिफारस केली आहे, दररोज किमान २ मिनिटे दात घासावे, रात्री ब्रश न केल्याने अन्नाचे अवशेष दातांमध्ये अडकतात, त्यामुळे नंतर किडण्याची समस्या निर्माण होते. निरोगी, चमकदार आणि मजबूत दातांसाठी, रात्री ब्रश करा.
झोपण्याची एकच वेळ
तुमची झोपण्याची वेळ दररोज बदलत असेल तर ही सवय शरीराला हानी पोहोचवू शकते. रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. झोपण्याच्या वेळेची दिनचर्या योग्य असणे देखील आवश्यक आहे, व्यत्यय किंवा त्यात दैनंदिन बदल शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. याबाबत प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
चहा, कॉफी सेवन
काही जणांना अनेकदा रात्री चहा, कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीचा मेंदूवर उत्तेजक प्रभाव पडतो, त्यामुळे तो ‘अलर्ट’ स्थितीत येतो हे सर्वज्ञात सत्य आहे. अशा स्थितीत रात्री कॉफी प्यायल्याने झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. झोपेच्या वेळेपूर्वी कॅफिन किंवा अल्कोहोलच्या सेवनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
मध्यरात्री खाणे
मध्यरात्री भूक लागू शकते, विशेषतः जर तुम्ही रात्रभर काम करत असाल. पण हीच भूक जर सवयीने मध्य रात्रीच्या जेवण किंवा नाश्त्यात बदलत असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा गोष्टींचे सेवन केल्याने पोटात फुगणे, गॅस आणि अपचन होऊ शकते. तसेच तुमच्या झोपेत अडथळा निर्माण होतो.