मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
जगभरात सध्या वेगवेगळ्या गंभीर आजारांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे, यामध्ये मधुमेह, कर्करोग, हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांची प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकीच कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. त्यामध्ये सुमारे तीन दशकांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रकरणे दिसून आली आहेत. कर्करोग हा सर्वात प्राणघातक रोग मानला जातो असून त्यामुळे बहुतेक वेळा रुग्ण बळी पडतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोगाचे वेळेवर निदान न होणे हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
कर्करोगाचा प्राथमिक अवस्थेत शोध लागल्यास, गंभीर आजार वाढण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी होण्यास मदत होते. यासाठी त्या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यांच्या आधारे कर्करोगाचा प्राथमिक अवस्थेत निदान होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि कर्करोगाच्या पेशी शरीराच्या सर्व भागांमध्ये वाढू शकतात. फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी सर्वात प्राणघातक मानला जातो. जगभरात दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. भरपूर धूम्रपान व तंबाखूचे सेवण करतात किंवा हानिकारक रसायनांच्या संपर्कात असतात त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे कठीण असते. काहीवेळा स्थिती प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत शोधणे कठीण होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास शरीरात काही चिन्हे दिसू शकतात, त्या आधारे हा आजार ओळखता येतो.
एखाद्याला सतत खोकल्याची समस्या अनेक कारणांमुळे असू शकते, परंतु कर्करोग हा देखील त्यापैकी एक आहे. तसेच आरोग्य तज्ञांच्या मते, सर्दी किंवा फ्लूमुळे देखील खोकला येऊ शकतो, परंतु दहा दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या लोकांना सतत खोकला होऊ शकतो. नैसर्गिकरित्या खोकला हा बाह्य कणांना तुमच्या वायुमार्गात आणि फुफ्फुसांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा एक मार्ग आहे, परंतु दीर्घकाळापर्यंत खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. काही जणांना खोकल्यापासून रक्त येण्याचाही त्रास होऊ शकतो.
बहुतांश कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सतत वजन कमी होणे ही सर्वात सामान्य समस्या मानली जात आहे. कमी कालावधीत कोणतेही प्रयत्न न करता ४ किलो किंवा त्याहून अधिक वजन कमी होणे हे अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. कर्करोगाच्या पेशींच्या वाढीमुळे भूक न लागणे आणि शरीराचे वजन कमी होणे देखील होऊ शकते. कर्करोगाने ग्रस्त असताना, कर्करोगाच्या पेशी त्यांच्या वाढीसाठी तुम्ही खाल्लेल्या अन्नातून निर्माण होणारी ऊर्जा वापरण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे थकवा येतो आणि वजन कमी होते. वजन कमी होणे हे कर्करोगाचे एक महत्त्वाचे लक्षण असून त्याकडे दुर्लक्ष करू नये.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. जेव्हा कर्करोगाच्या पेशी फुफ्फुसात वेगाने वाढू लागतात, तेव्हा ते श्वासनलिका अवरोधित करतात किंवा अरुंद करतात, ज्यामुळे फुफ्फुसातील हवेचा प्रवाह कमी होतो. अशा परिस्थितीत श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. तसे, इतर अनेक परिस्थितींमध्ये, श्वासोच्छवासाची समस्या असू शकते, परंतु जर तुम्हाला बर्याच काळापासून अशा प्रकारच्या समस्येने ग्रासले असेल तर त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या. दीर्घकाळ शरीरात सतत वेदना होत राहण्याच्या समस्येकडेही दुर्लक्ष करता कामा नये. फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या लोकांना विशेषतः छाती, खांदे किंवा पाठदुखीचा अनुभव येऊ शकतो. छातीत दुखण्याची समस्या सतत जाणवत असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते.
(सूचना – सदर बातमी ही वैद्यकीय अहवालातील माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. संबंधित वृत हे वाचकाचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी आहे. यासंदर्भात अधिक तपशीलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)