नागपूर – आरोग्याबाबत वारंवार होणाऱ्या जनजागृतीमुळे भाज्या, पालेभाज्या तसेच फळं खाण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. तुम्हाला देखील फळं खायची असतील तर त्याच्या ठरलेल्या वेळा पाळल्या तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.
यातीलच एक गुणकारी, सर्वांना आवडणारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहज उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळं. सर्वसामान्यांच्याच आवाक्यात असलेल्या या फळाचे अनेक फायदे आहेत. पाचनव्यवस्था सुधारते, हृदय निरोगी ठेवते, रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. त्याच्या या फायद्यांमुळेच अनेकांना केळे प्रिय असते. पण केळे रात्री खाऊन चालते की नाही, याबद्दल अनेकांना शंका असते.
उत्तम झोपेसाठी
तुमचा दिवस जर दगदगीचा गेला असेल तर तुम्ही एक केळं खायलाच हवं. यात पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्याने तुम्हाला आराम वाटू शकतो. शिवाय तुम्हाला चांगली झोपही लागेल.
रक्तदाब कमी करते
जर तुम्हाला टेन्शन घ्यायची सवय असेल तर तुमच्या खाण्यात सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असायला हवे. केळ्यामधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत करते.
गोड खाण्याची तलफ
रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड पदार्थ तोंडात टाकायची अनेकांना सवय असते. खरं तर जास्त गोड खाणे फार चांगले नाही. त्याऐवजी केळं खाणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होईल आणि शरीराला फायदाही होईल.
(आम्ही तुम्हाला दिलेली ही माहिती सर्वसाधारणपणे सर्वांना लागू होईल अशी आहे. पण सर्दी, खोकला, सायनस असा कोणताही त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पथ्यपाणी करावे.)