इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्याच्या काळात अनेक नवनवीन आजार वाढत असताना जुने आजार देखील प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येत आहेत. त्यात प्रामुख्याने हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग हे तीन गंभीर आजार केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील नागरिकांची मोठी समस्या बनली आहे, याला कारण म्हणजे धकाधकीच्या जीवनात कामाच्या वाढत्या ताणासोबतच आजारापणाकडे देखील दुर्लक्ष होत आहे.
WHO) म्हणते
बहुतांश नागरिकांना अनेक प्रकारचे विकार होत असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हे आजार वाढत जातात. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका ही देखील एक सामान्य गोष्ट झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे दरवर्षी सुमारे २०.९ दशलक्ष नागरिक मरण पावले, हे प्रमाण जगभरातील सर्व जागतिक मृत्यूंपैकी ३४ टक्के आहे. डब्ल्यूएचओचा (WHO) म्हणणे असे आहे की, यापैकी ८५ टक्के नागरिकांचा मृत्यू हा हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकमुळे होतो. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराची लक्षणे कोणती? यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन नुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा तणाव किंवा कळ जाणवते जी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा ती निघून जाते आणि परत येते.
महिला आणि पुरुष
हृदयविकाराच्या पूर्वी बैचेनी किंवा अस्वस्थपणामुळे तुम्हाला दबाव, जडपणा किंवा वेदना जाणवू शकतात. अशक्तपणा, डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) सूचित करते की, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असू शकतात. पुरुषांमध्ये सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, परंतु स्त्रियांमध्ये इतर सामान्य लक्षणे आहेत. हृदयविकाराचं प्रमाण हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळतं, असा एक समज आहे. परंतु, महिलांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारे कारण हे ‘हृदयविकार’ आहे, हे किती जणांना माहीत आहे. पुरुषांच्या तुलनेत १० वर्षे उशिरा महिलांना हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार होतो. पण त्याचे स्वरूप मात्र अधिक गंभीर असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक महिलांना याबाबत माहितीच नसते.
निदान उशीराने
हृदयविकार आल्यानंतरच्या पहिल्या वर्षात पुरुषांच्या तुलनेत ५० टक्के हून अधिक महिलांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतरच्या पहिल्या सहा वर्षांमध्ये हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने दुप्पट असते. खरे तर भारतातील महिलांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांचे असल्यामुळे वयाच्या पन्नाशीनंतर महिलांनासुद्धा पुरुषांइतकाच हृदयविकाराचा धोका असतो. दर चारपैंकी एका महिलेला एखादा हृदयविकार जडला असल्याचे अनेक अभ्यासांती आढळून आले आहे. एका अभ्यासानुसार असेही आढळून आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराचे निदान उशीरा होते. महिलांकडून कुटुंबाला नेहमी महत्त्व दिले जात असल्याने ते नेहमीच हृदयविकाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. करॉनरी मायक्रोव्हॅस्क्युलर डिसीज (हृदयातील सूक्ष्मरक्तवाहिन्यांचा आजार) हा महिलांमध्ये सामान्यपणे आढळून येतो. कथित ‘ब्रोकन हार्ट सिन्ड्रोम’ किंवा ‘टाकोस्टुबो कार्डियोमायोपथी’ हे आजारही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यात हृदयातील मुख्य स्नायू विस्फारतात.
रजोनिवृत्ती दरम्यान
आणखी एका अभ्यासाअंती असेही दिसून आले आहे की, रजोनिवृत्तीनंतर महिलांमधील हृदयविकाराच्या झटक्यांची शक्यता वाढते. रजोनिवृत्तीची प्रक्रिया साधारण ४५ ते ५० वयादरम्यान सुरू होते. या कालावधीत महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजेन या संप्रेरकाची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयविकारांमध्ये वाढ होते. एस्ट्रोजनेचा संबंध अधिक पातळीमध्ये हाय डेन्सिटी लपोप्रोटिन असण्याशी आहे. रजोनिवृत्तीनंतर नैसर्गिक एस्ट्रोजेनचे लो डेन्सिटी लायपोप्रोटिनस्त्रवल्यामुळे उपकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते आणि अपायकारक कोलेस्टरॉलचे प्रमाण वाढते. परिणामी, हृदयविकार होण्याची शक्यता असते.
महिलांनो इकडे लक्ष द्या
विशेषतः महिला आराम करत असताना किंवा निद्रावस्थेतही ही स्थिती उद्भवू शकतात. बहुधा हृदयाला नुकसान झाल्यानंतर महिला हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. कारण ही लक्षणे बहुधा हृदयविकाराच्या झटक्याशी जोडली गेलेली नसतात आणि कदाचित महिलांनी त्या लक्षणांना फार महत्त्व दिलेले नसते. काही महिलांकडून छातीदुखीला ताण किंवा अन्य कारण म्हणून दुर्लक्ष केले जाऊ शकते. महिलांच्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या असू शकतातच, त्याचप्रमाणे या गुठळ्या हृदयाला रक्त पुरविणाऱ्या छोट्या रक्तवाहन्यांमध्येही असू शकतात. या आजारात जोखीम घटक पुरुष आणि महिलांसाठी सारखेच असतात. यात धुम्रपान, उच्च रक्तदाब, कोलेस्टरॉलची उच्च पातळी, मधुमेह, शारीरिक हालचालींचा अभाव, गर्भनिरोधक गोळ्या, तणाव आणि नैराश्य यांचा समावेश होतो. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि व्यायाम, आहार व औषधांचा वापर करून या धोकादायक घटकांचे नियंत्रण करा. महिलांमध्ये दिसणारी लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात हे एक आव्हान आहे.
महिन्याभरापूर्वीचे संकेत
वास्तविक हृदयविकाराच्या एक महिना आधी आपले शरीर आपल्याला अनेक संकेत देत असते. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये सारखीच असतात, परंतु पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ही लक्षणे ओळखणे अधिक कठीण असते.तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीत दुखणे १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते. काही लोकांना छातीत हलके दुखते, तर काही लोकांना जास्त-तीव्र वेदना होतात. हृदयविकाराचा झटका कोणालाही, कुठेही, कधीही येऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.
शरीरातील बदल
हृदय विकाराच्या एक महिना आधी तुमच्या शरीरात काही विशेष बदल व्हायला लागतात. किंवा तुमचे शरीर तुम्हाला सतर्क करू लागते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ही चिन्हे ओळखून तुम्ही वेळीच खबरदारी घेऊ शकता. काही सामान्य लक्षणांमध्ये छातीत दुखणे, अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे यांचा समावेश असतो. ज्याकडे लोक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. तसेच, यावर उपाय म्हणून काही लोक वेदना कमी करण्याच्या गोळ्या घेऊन झोपतात. पण ही सामान्य समस्या नसून हा सौम्य हृदयविकाराचा झटका असू शकतो.
सारखीच लक्षणे
अनेक स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुषांसारखी स्पष्ट होत नाहीत. हार्मोनल बदलांमुळे ही सर्वात सामान्य लक्षणे आहेत. म्हणूनच स्त्रियांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे आणि हार्मोनल बदलांबद्दल संभ्रम आहे. तथापि, स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांसारखीच असतात. परंतु जेव्हा तुमचे हृदय वेगाने धडधडते, तेव्हा तुम्हाला तुमच्या छातीत घट्टपणा जाणवतो आणि तीव्र वेदना, श्वास लागणे या समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीत, आपण वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हे नक्की करा
काही वेळा रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मात्र यासोबतच रुग्णाला तातडीने रुग्णालयात न्यावे, तो जर रुग्ण बेशुद्ध असेल तर त्याला ताबडतोब सपाट पृष्ठभागावर झोपवा. नंतर नाकाजवळ बोटे घेऊन त्याचा श्वास तपासा आणि त्याची नाडी देखील तपासा. तसेच श्वासोच्छवास किंवा नाडी काम करत नसेल तर लगेच CPR द्या. यासाठी तुमचा डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्यावर ठेवून बोटे बंद करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि रुग्णाची छाती पूर्ण शक्तीने दाबा. रुग्णाला शुद्धी येईपर्यंत दर मिनिटाला १०० कॉम्प्रेशन द्यावे लागतील. तसेच २५ ते ३० वेळा रुग्णाला तोंडाने ऑक्सिजन द्या. तोंडातून ऑक्सिजन देताना व्यक्तीचे नाक बंद करा, असे केल्याने फायदा होऊ शकतो.
Health Tips Heart Attack Symptoms Before One Months