नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याची केशभूषा आणि वेशभूषा यावरून ठरते असे म्हटले जाते. आजच्या ताणतणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीत स्त्री असो की पुरुष यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती होय. केस गळती टाळण्यासाठी त्यांना तेल लावावे तसेच आणखी काय करावे? याचा प्रत्येक जण विचार करतो केसांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेणे यासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे ठरते.
केवळ महिलांनीच नव्हे तर पुरूषांनी सुंदर आणि घनदाट केसांसाठी तेल मसाज करणे अतिशय आवश्यक आहे. तेल मसाज न केल्यास केस कमकुवत होऊन तुटण्याची तसंच गळण्याची शक्यता असते. तेलामुळे कोरड्या केसांची, कोंडा तसंच केसांशी संबंधित अन्य समस्या कमी होण्यास मदत मिळते. तेलामुळे आपल्या केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल मसाज करावा.
पुर्वीच्या काळ घरातील ज्येष्ठ मंडळी केसांना नियमित तेल लावण्याचा सल्ला देत असतात. पण रोजची धावपळ, ऑफिस किंवा अन्य महत्त्वाच्या कामांमुळे तेल लावणे शक्य होत नाही. पूर्वी लोक आंघोळ करण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तेलानं मसाज करत असते. यामुळे त्वचेला भरपूर फायदे होतात. याच प्रमाणे केसांनाही तेल लावण्याचे महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केसांना तेल लावल्यास भरपूर लाभ मिळतात.
केसांच्या वाढीसाठी, केस जास्त गळू नयेत म्हणून आणि केसांच्या मुळांना चांगले पोषण मिळावे यासाठी आपण त्यांना तेलाने मसाज करतो. बाजारात विविध प्रकारची तेलं येतात. अमक्या तेलामुळे केसांना हा फायदा होईल, तमक्या तेलामुळे केसांची ही समस्या दूर होईल असे अनेक दावे विविध कंपन्यांद्वारे केले जातात.महागड्या शाम्पूप्रमाणे महागडे तेल वापरले की आपल्या केसांच्या समस्या दूर होतील असे काही जणांना वाटते. पण तेल लावताना ते कधी लावायचं हेही तितकच महत्त्वाचं आहे.
आठवड्यातून दोन वेळा केसांना तेल लावू शकता. पण केस धुतल्यानंतर केसांना तेल लावणे शक्यतो टाळावे. कारण यामुळे केसांमध्ये धूळ आणि माती जमा होण्याची शक्यता असते. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. यामुळे आपल्या केसांसह टाळूच्या त्वचेलाही नुकसान पोहोचते. तेल मसाजमुळे टाळूच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते.
केसांना नियमित तेल लावल्यास कोंडा आणि टाळूला येणारी खाज कमी होण्यास मदत मिळेल. तेलामध्ये कडुलिंबाची पाने गरम करून घ्या आणि आंघोळ करण्यापूर्वी या तेलानं टाळू आणि केसांचा मसाज करावा. यानंतर कोमट पाणी आणि शॅम्पूने केस धुवावे. हा उपाय केल्यास तुमची कोंड्याच्या समस्येतून सुटका होईल. कोंड्यामुळे केस गळती देखील जास्त प्रमाणात होते. नियमित तेल मसाज केल्यास केस गळतीचाही त्रास दूर होईल.
महत्वाचे म्हणजे डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी केसांना आयुर्वेदिक तेल लावा. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक लाभदायक ठरेल. आयुर्वेदानुसार डोकेदुखीची समस्या वाताच्या त्रासाशी संबंधित असतो. हा त्रास कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस केसांना तेल लावा. वाताची समस्या कमी करण्यासाठी ही वेळ उत्तम असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे. तेलामुळे केसांना व्हिटॅमिन आणि खनिजांचा पुरवठा होतो. केसांवर नैसर्गिक चमक देखील येते.
केस धुतल्यावर तेल लावल्यास केस चिपचिपे तर दिसतातच पण केसांवर धूळ किंवा इतर घाण बसून केसांचा पोत खराब होतो तेलामुळे फोड पसरण्याची आणि वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे फोड असताना तेल लावणे टाळावे, तसेच चेहऱ्यावर जास्त प्रमाणात पिंपल्स आले असतील तर तेल लावणे शक्यतो टाळायला हवे. काही वेळा आपण डोक्याला लावलेले तेल चेहऱ्यावर येते आणि या कपाळावरील किंवा गालावरील फोडांमध्ये जमा होते. यामुळे चेहरा जास्त खराब होण्याची शक्यता असते. पिंपल्स दूर ठेवण्यासाठी केस स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते.
केस लांबसडक, घनदाट, निरोगी आणि काळेशार असतात, तेव्हा केस तुटणे, केस दुभंगणे किंवा केस गळतीची समस्या निर्माण होत नाही. यामुळे केसांची चांगली वाढ होते. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या केसांना आणि टाळूला चांगल्या पद्धतीनं तेल लावावे. दुसऱ्या दिवशी सकाळी केस कोमट पाण्याने धुऊन घ्या. तेलामुळे केसांमधील पेशी निरोगी आणि मजबूत होतात. यामुळे केस पांढरे देखील होत नाहीत.
खरे तर रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी आपल्या केसांना तेल लावून हलक्या हातानं मसाज करा. यामुळे तुम्हाला गाढ झोप येण्यास मदत मिळते. केसांची वाढ होण्यासाठी तुम्ही शिसव तेलाचा वापर करू शकता. आयुर्वेदानुसार शिसव तेलामुळे टक्कल पडणे, लहान वयातच केस पांढरे होणे आणि डोकेदुखीच्या त्रासातून सुटका होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त तुम्ही नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता. नारळ तेलामुळे केसांना नैसर्गिक स्वरुपातील मॉइश्चराइझर मिळण्यास मदत मिळते. तेल लावण्यापूर्वी आपल्या टाळूची त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे तेलातील पोषक घटकांचा खोलवर पुरवठा होतो.
आयुर्वेदामध्ये केसांना तेल लावण्याचे भरपूर महत्त्व आहे. केसांशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी तेलाचा नक्की वापर होतो. त्याचप्रमाणे केसांत कोंडा झाला असेल आणि तो दूर करायचा असेल तर केसांना तेल लावणे टाळा. कोंडा असेल आणि त्यावर तेल लावल्यास कोंडा वाढण्याची शक्यता असते किंवा तेलामुळे कोंडा आहे तसाच राहतो. म्हणून कोंडा असताना तेल लावू नका. काहींना घामामुळे किंवा अन्य काही इन्फेक्शन्समुळे डोक्यामध्ये फोड असण्याची शक्यता असते. अशावेळी तेल लावणे शक्यतो टाळावे.
Health Tips Hair Oil Care Dos and Don’ts
Nutrition Improvement Texture Massage