इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या आहाराबाबत आणि तब्येतीबाबत अलीकडे सगळेच सजग झाले आहेत. त्यामुळेच चौफेर किंवा बॅलन्स्ड डाएटला लोकांची पसंती असते. यातूनच लोकांचा फळांकडे ओढा वाढला आहे. फळे खाणे काही वाईट नाही, फायदेशीरच आहे. पण त्यावर जर मीठ किंवा साखर घालून खाण्याची सवय तुम्हाला असेल तर मात्र, हीच फळे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात. त्यामुळे वेळीच ही सवय सोडवण्यासाठी प्रयत्न करा.
फळे खाणे हे तब्येतीसाठी नेहमीच चांगलं असत. अनेकांना फळे खायला आवडत नसलं तरी त्या – त्या सीझनमध्ये येणारी फळे खाणारे खवय्ये देखील असतात. फ्रुट सॅलड हा तसा तर सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. तर काहीजण फळांच्या फोडी करून त्यावर मीठ, साखर किंवा अगदी चाट मसाला घालून खाणं पसंत करतात. बाहेरही अनेकदा अशीच फ्रुट प्लेट मिळते. हेल्दी म्हणून अनेकदा त्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही देखील अशी फ्रुट प्लेट खाता का? असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारे फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
मीठ, साखर किंवा चाट मसाला टाकून फळे खाल्ल्याने फळांची चव वाढते. हॉटेलमध्ये किंवा घरी देखील आपण काकडी, कांदा आणि गाजर यांचं सॅलड बनवत त्यावरही मीठ किंवा चाट मसाला टाकून खातो. हे देखील योग्य नाही. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून फळे खाण्याची योग्य पद्धत कोणती असावी हे आम्ही सांगतो.
आहारतज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळावर मीठ घातले की त्याला पाणी सुटते. यामुळे फळांमधील पोषक तत्त्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्ली तर शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, चाट मसाल्यातही मीठ असते. हे शरीरासाठी हानीकारक असते.
वास्तविक फळे नैसर्गिकरित्या गोड असतात. त्याला त्याची चव असते. त्यावर मीठ किंवा साखर घालून खाल्ल्याने शरीरात कॅलरीज वाढते. मुळातच फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात. त्यातच फळांवर साखर टाकून खाल्याने शरीरात साखरेचं प्रमाण वाढते. यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. मधुमेहींसाठी हे फारच त्रासदायक आहे.
याचबरोबर फळे खाताना आपण आणखी एक चूक करतो. ती म्हणजे जेवताना आपण फळे खातो. मात्र, आपले जेवण सगळ्या गुणधर्मानी युक्त असतं. त्यामुळे आपल्याला कोणत्याही अतिरिक्त गुणांची गरज नसते. जेव्हा अन्नासोबत फळे खातो तेव्हा कॅलरीजचे प्रमाण वाढतात. त्यामुळे अन्न आणि फळे एकत्र खाणं टाळावे.
(या माहितीची पुष्टी इंडिया दर्पण करत नाही. योग्य वैद्यकीय सल्ल्यानेच फळांचे सेवन करावे.)
Health Tips Fruit Eat with Salt Benefits Side effects