विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सध्या ताणतणावाच्या काळात लोकांची जीवनशैली बदलली असून आहारातही बदल झाला आहे. अनेकांना कोणत्या ना कोणत्या शारीरिक समस्याला तोंड द्यावे लागत आहे. यात मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा समावेश आहे. हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब आज एक सामान्य समस्या बनली आहे. ही समस्या केवळ विशिष्ट नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांना होत आहे. वेळीच याची दखल घेतली गेली नाही, तर ही बाब गंभीर बनू शकते.
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत ते आपण जाणून घेऊ या…
१) हिरव्या भाज्या : प्रत्येकाने आपल्या आहारात हिरव्या भाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत. यात फायबरपासून मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि इतर पौष्टिक घटक असतात. आहार तज्ज्ञ म्हणतात की, दररोज हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
२) केळी : केळी हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर फळांपैकी एक मानले जाते. त्यात अनेक फायदेशीर खनिज घटक असतात, त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे पोटॅशियम हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करते.
३) स्ट्रॉबेरी : नियमितपणे स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत होते. वास्तविक, त्यात भरपूर अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन-सी आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. तसेच त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्चरक्तदाब नियंत्रित करते.
४) ब्रोकोली : यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात. आपल्या रक्तदाबाची पातळी सामान्य ठेवण्यासाठी आपण नियमितपणे आपल्या आहारात ब्रोकोलीचा समावेश केला पाहिजे.
५) पिस्ता : पिस्ता आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि पोटॅशियम यासारख्या आवश्यक पोषक तत्त्वे असतात. आहार तज्ज्ञ म्हणतात की, नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्याची शक्यता कमी होते.
(सूचना : उच्च रक्तदाब या आजाराबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)