नागपूर – अनेक संशोधनावरून लक्षात आले की आपली जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयीचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. खाण्या-पिण्यात पौष्टिक पदार्थांची कमतरता अनेक आजारांना आमंत्रण देणारी ठरू शकते. ब्रेन स्ट्रोक हासुद्धा वेगाने विकसित होणार आजार आहे. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल होणे हे मुख्य कारण असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. २०१६ मध्ये ९१ हजारांहून अधिक कॅनडाच्या नागरिकांचा मृत्यू स्ट्रोक किंवा हृदय रोगांमुळे झाला आहे. प्रत्येक सात सेकंदाला एकाचा मृत्यू होतो, असे हार्ट अँड स्ट्रोक फाउंडेशनने म्हटले आहे.
आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, मेंदूत रक्तप्रवाहामध्ये अडथळे आल्यानंतर स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसल्याने मेंदूतील पेशींमध्ये पुरेसा ऑक्सिजन मिळू शकत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उत्पन्न होतात. गंभीर परिस्थितीत मेंदूतील रक्तवाहिका फुटू शकतात. त्याला रक्तस्त्रावी स्ट्रोक असे म्हटले जाते. खाण्या-पिण्याच्या सवयी बदलून या आजारापासून आपण वाचू शकतो. ब्रेन ट्रोकपासून बचाव करण्यासाठी काय करावे अथवा करू नये हे जाणून घेऊयात.
ट्रान्स फॅट असलेले अन्न
प्रक्रिया केलेले जंक फूड आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये ट्रान्स फॅट असतात. ट्रान्स फॅट शरीरासाठी खूपच घातक मानले जाते. कारण या फॅटमुळे शरीराची सूज वाढते. शरीरावरील सूजेला अनेक गंभीर आजारांचे कारण सांगितले जाते. अशा खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
मीठ
खूप जास्त मिठाचे सेवन करणार्या नागरिकांना उच्च रक्तदाबाचा धोका सर्वाधिक असतो. पाकिटबंद अन्नपदार्थांमध्येही मिठाचे प्रमाण जास्त असते. जास्त मिठाचे सेवन स्ट्रोक आणि हृदयरोगाची जोखीम वाढविते. जेवणात मिठाचे प्रमाण सामान्य ठेवल्यास रक्तादाबाला नियंत्रित करण्यास मदत मिळू शकते.
रेड मीट
लाल मांस अर्थात रेड मीटचे सेवन करणार्या नागरिकांमध्ये स्ट्रोकचा धोका ४२ टक्क्यांहून अधिक असतो, असे स्ट्रोक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात आढळले आहे. रेड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्याचे सेवन हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो. संशोधकांनी दहा वर्षात ३५ हजार स्वीडिश महिलांवर एक संशोधन केले आहे. त्याच्या निष्कर्षावरून याची पुष्टी केली आहे.
सॉफ्ट ड्रींक
संशोधकांच्या माहितीनुसार, स्ट्रोकची जोखीम कमी करण्यासाठी सोडा पिणे कमी करणे आवश्यक आहे. सोडा किंवा सॉफ्ट ड्रींकचे अधिक प्रमाणात सेवन करणार्या नागरिकांमध्ये स्ट्रोक होण्याची जोखीम ४० टक्क्यांहून अधिक असते. सोडा किंवा सॉफ्ट ड्रींकचे अधिक सेवन मधुमेहाचा धोका वाढवतो.