मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या ताणतणावाच्या काळात आहार-विहार याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विहार म्हणजे योग्य प्रकारचा व्यायाम, योगासने किंवा वर्कआऊट करणे होय. तरच आपले आरोग्य चांगले राहू शकते. आरोग्य चांगले तर सर्व काही चांगले असे म्हटले जाते ते खरे आहे.
व्यायामाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे व्यायाम योग्य पद्धतीने केला पाहिजे. तसे झाले नाही तर शरीराला लाभाऐवजी त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वर्कआउट करताना पाणी पिणे किती चांगले आहे, वर्कआऊटनंतर किती वेळाने पाणी प्यावे. याबद्दल फारसे बोलले जात नाही. व्यायाम करताना काही नियम पाळणे देखील आवश्यक आहे कारण त्यांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो.
व्यायाम करण्यापूर्वी पाणी कसे प्यावे: काही जण व्यायाम सुरू करण्यापूर्वी लगेच पाणी पितात, त्यामुळे त्यांना व्यायाम करताना पाण्याची गरज भासत नाही. व्यायामासाठी शरीर हायड्रेटेड राहणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु व्यायामापूर्वी लगेच पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडू शकते हे लक्षात ठेवा. खरे तर व्यायामाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नका. घसा ओला करण्याइतके पुरेसे पाणी घेणे चांगले.
व्यायामामुळे घाम येतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो, त्यामुळे घसाही कोरडा होतो. व्यायामामुळे शरीर तापते. त्यामुळे तहान भागवण्यासाठी काही जण पाणी पिण्यास सुरुवात करतात, हा चुकीचा मार्ग आहे. यामुळे तुमच्या स्नायूंना धक्का बसू शकतो, त्यामुळे छातीत दुखणे, पोटदुखी, उलट्या इत्यादी आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे 20-25 मिनिटांच्या व्यायामानंतरच पाणी पिणे योग्य आहे, कारण तोपर्यंत शरीराचे तापमान सामान्य झालेले असते. तसेच पाणी पिण्याचा हा नियम कार्डिओपासून पिलेट्स, योगासने, धावणे, किक-बॉक्सिंग, वेट ट्रेनिंग या सर्व प्रकारच्या व्यायामांना लागू आहे.