मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
ड्रायफ्रूट्स किंवा सुक्या मेवा मध्ये खजूराला महत्त्वाचे स्थान आहे, साधारणतः खजूर हे वाळवंटी प्रदेशात विशेषतः सौदी अरेबिया आणि आजूबाजूच्या राष्ट्रात पिकते. खजुरातील पोषक घटकांमुळे खजुराला ‘वडंर फूड’ असं म्हटलं जातं. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. कधीकधी वेळेवर अन्न न खाल्याने अशक्तपणा सुरू होतो. याकरिता आपण आपला आहार योग्य आणि वेळेवर घेणे महत्वाचे आहे. यासाठी खारीक, खजूर आपण फक्त सकाळी रिकाम्या पोटी सेवन केले तर फायदा होतो. आता त्याच्या आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेऊ या ..
खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. १०० ग्रॅम खजूर खाऊन २७७ कॅलरीज मिळतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनॉइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो. इतकेच नाही तर बद्धकोष्ठतेसारख्या समस्येपासून दूर राहण्यासाठी खजूर उपयुक्त असतो.
खजुरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, लोह वाढण्यासाठी किंवा विविध खनिजे आणि व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी खजूर फायदेशीर असतो. खजूरामध्ये सेलेनियमबरोबरच १५ खनिजे असतात. हे घटक कॅन्सरशी लढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. याबरोबरच खजुरात २३ प्रकारचे अमिनो अॅसिड तसेच अनेक असंतृप्त फॅटी अॅसि़डस असतात. त्यामुळे हे सगळे फायदे हवे असतील तर दिवसभरात ३ खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
खजूर खाण्याचे परिणाम दिसण्यासाठी किमान १ आठवडा सलग खजूरांचे सेवन करायला हवे. आहारतज्ज्ञही अनेकदा लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्याना आवर्जून खजूर खाण्याचा सल्ला देतात. खजूरामध्येही काळा खजूर, लाल खजूर, खूप कोरडा खजूर, चिकट खजूर असे बरे प्रकार पाहायला मिळतात. या खजुराचे लाडू, चटणी, बर्फी, मोदक, खीर असे बरेच पदार्थ आपण करु शकतो. आरोग्याच्या काही समस्यांसाठी नियमित खजूर खाणे फायदेशीर असते.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात लोहाची कमतरता असते व अशक्तपणाची स्थिती निर्माण होते. तेव्हा खजूरांचे नियमित सेवन केले तर अशक्तपणा टाळू शकतो आणि शरीरातील लोहाची कमतरता दूर होऊ शकते. कारण खजुरामध्ये जास्त प्रमाणात लोह आढळते. काही वेळा लहान मुले किंवा वृध्द लोकांच्या आतड्यात जंत येतात, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी जर सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ले तर हे जंत नष्ट होण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त, आपले हृदय देखील खजूरांच्या सेवनाने मजबूत राहते.
पोटाच्या समस्या किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्यांनी आपण ग्रस्त असाल तर खजूर खाऊ शकतो. त्यातील फायबर बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर मात करण्यास, आतड्यांच्या योग्य हालचालींसाठी आणि आपली पाचन प्रणाली सुधारण्यास मदत करू शकते. म्हणून दररोज खजूर खाणे योग्य ठरते. खारीक आणि खजूर तणाव आणि अशक्तपणावर मात करण्यास मदत करू शकतात. एवढेच नाही तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका इत्यादींचा धोका कमी करण्यासाठीही खजूर फायदेशीर आहे
खजूरामध्ये असणाऱे अँटीऑक्सिडंटस हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल नष्ट करण्यास मदत करतात. हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोक सारख्या जीवावर बेतणाऱ्या समस्यांपासून दूर राहण्यास याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे आहारात आवर्जून खजूराचा समावेश करायला हवा. खजुरातील मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, कॉपर, मँगनिज हे हाडांसाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे रक्त घट्ट करण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो.
डोक्यातील ताण आणि सूज कमी करण्यासाठी खजूराचा चांगला उपयोग होतो. स्मरणशक्ती वाढवण्याबरोबरच मेंदूचे कार्य वेगवान करण्यासाठी, मेंदूशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी खजूर चांगला असतो.खजूरातील फायबर पोटातील चांगले बॅक्टेरीया वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. पोटात चांगले जिवाणू वाढविण्यासाठी खजूर उपयुक्त आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो. प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खजूर फायदेशीर असतो. नियमित खजूर खाल्ल्याने शुक्राणूची (स्पर्म) गुणवत्ता आणि संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे खजूर हे पुरुषांच्या प्रजननासाठी उपयुक्त आहे.
Health Tips Dry Dates Ayurved Benefits Nutrition