इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मधुमेही किंवा डायबिटीस झालेल्या रुग्णांनी उपवास करणे टाळायला हवे, किंवा उपवास करायचा असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. तसेच त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा आपल्या आरोग्याला मोठा धोका संभवू शकतो.
डॉक्टरांचा सल्ला
एखाद्या व्यक्तीच्या स्वादुपिंडात इन्सुलिनची कमतरता असते किंवा इन्सुलिन कमी प्रमाणात पोहोचते. तेव्हा त्या व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढते त्यालाच मधुमेह म्हणतात. त्यामुळे जास्त वेळ उपाशी राहण्याचा त्रास होतो आणि त्यांची साखरेची पातळी कमी होते. या स्थितीला हायपोग्लाइसेमिया म्हणतात. यात, रुग्णाचे हात पाय थरथरू लागतात व शरीरात अशक्तपणा जाणवतो, हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे डायबेटीसच्या रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपवास करू नये.
नियम पाळा :
डायबेटीसची औषध सुरु ठेवून उपवास करणे सुध्दा हानिकारक आहे. तसेच औषध बंद करुन ही उपवास करणे धोकादायक ठरू शकते. आपल्या धर्मात उपवासाचा नियम हा शास्त्रीय आधारावर ठेवण्यात आला आहे. शरीरातील तामसी घटक बाहेर काढण्यास उपवास हा एक चांगला मार्ग आहे, पण आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून उपवास करणे चुकीचे आहे. मधुमेहाचा त्रास असेल तर आहार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी राहणे धोक्याचे आहे.
उपवासाचे प्रकार
उपवासाचे तीन प्रकार आपल्याला साधारणपणे करता येतात. एक म्हणजे ठराविक कालावधीसाठी काहीही न खाणे, दुसरे म्हणजे काही जण निर्जली उपवास करतात. अशा पध्दतीने उपवासाचा हा प्रकार अतिशय कडक असतो. हा उपवास करत असताना ज्यांना इन्शुलिन आहे किंवा डायबेटीसची स्ट्राँग औषध सुरू आहेत. तसेच तीव्र डायबेटीस असेल तर अशा व्यक्तीला औषध घेतल्यावर खूप काळ उपाशी राहिल्यानंतर शुगर कमी होण्याचा आणि धोकादायक पातळीपर्यंत कमी होण्याचा धोका जास्त असतो.
साखरेची पातळी
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी राहणे धोक्याचे आहे. विशेषत: टाइप 1 मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांनी उपवास करू नये, कारण उपवासामुळे त्यांच्या आरोग्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. टाइप 2 मधुमेह असलेल्यांना उपवासाचा धोका थोडा कमी असतो. त्यामुळे काही गोष्टींचे पालन करून ते उपवास करू शकतात. याशिवाय उपवासाच्या वेळी दिवसातून काही वेळा साखरेची पातळी तपासणे आवश्यक आहे.
पाणी प्या, फळे खा
आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, मधुमेहाचा आजार असेल तर उपवासाच्या वेळी मीठासह जेवण घ्यावे, तसेच फळेही खात राहिली पाहिजे आणि त्यासोबत सफरचंद, केळी, बदाम, अक्रोड यांसारखी खाऊ शकतात. दिवसभर वेळोवेळी पाणी, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी पित राहा. दरम्यान द्रव पदार्थांचे सेवन केले तर साखरेची पातळी सामान्य राहील. नवरात्रीमध्ये उपवास करताना भूक लागू नये किंवा भूक भागवण्याकरता अनेक जण चहाचे पितात, मात्र चहातील साखर ही मधुमेहींसाठी घातक असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी उपवास केला तरी चहाचे सेवन अजिबात करू नये. याउलट आहारात फळांचे सेवन करावे.
अन्यथा घातक
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपवास ठेवावा लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. डॉक्टरांनी उपवास ठेवण्यास मनाई केली असेल, तर कधीही उपवास करू नका, अन्यथा ते शरीराला घातक ठरू शकते. विशेषत: आपली रक्तातील साखर नियंत्रणात नसेल उपवास करू नये. तसेच मधुमेहाशी संबंधित म्हणजे मूत्रपिंड, यकृत किंवा हृदयविकार, अशा समस्या असतील तर उपवास करणे योग्य नाही.
Health Tips Diabetic Patient Upvas Fast