इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भाताशिवाय अनेक भारतीयांचे जेवण पूर्ण होत नाही, इतके महत्त्व भाताला भारतीय अन्नपदार्थांमध्ये आहे. पण मधुमेही रुग्णांच्या मनात नेहमीच भात खावा की नाही अशी शंका असते. विशेषतः पांढरा भात खाण्याबाबत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मोठा संभ्रम असतो. पण योग्य काळजी घेत भाताचे सेवन केले तर मधुमेहींनादेखील भात खाता येऊ शकतो.
मधुमेहाच्या बाबतीत, रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. ग्लुकोज हा रक्तातील ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे आणि ही ऊर्जा अन्नातील कर्बोदकांमधे येते. मधुमेहानंतर निरोगी राहण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्बोहायड्रेट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे संतुलित आहार घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. मधुमेहात भात खावा की नाही, तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे आणि जगातील अर्ध्या लोकसंख्येच्या दैनंदिन आहारात भाताचे महत्वाचे स्थान आहे. विशेषत: आशियात भात हा लोकप्रिय आहे. तांदूळ हे मऊ, चविष्ट, सहज पचण्याजोगे आणि ऊर्जायुक्त अन्न आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा की नाही आणि असल्यास त्यांच्यासाठी कोणता भात योग्य आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
डॉक्टरांच्या मते, प्रत्येक १०० ग्रॅम तांदळात सुमारे ३४५ कॅलरीज असतात आणि तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यात फायबर, मायक्रोन्युट्रिएंट्स आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण कमी असते. पण यानंतरही तुम्ही भात खाऊ शकता. मात्र यासाठी त्याचे गुणवत्तेची काळजी घेणे आवश्यक आहे.
जर मर्यादित प्रमाणात भात खाल्ला तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. भातासोबत मात्र आहारात भाज्या, डाळी, कडधान्ये, सॅलड्स किंवा भाज्यांचे सूप समाविष्ट केले तर ते शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रित ठेवण्यास मदत करते. प्रत्येक जेवणात प्रथिने, निरोगी चरबी आणि कमी – कार्ब भाज्या यासारख्या इतर पोषक तत्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास परिपूर्ण आहार शरीराला मिळू शकतो. तपकिरी तांदूळ आणि पांढरा तांदूळ दोन्हीमध्ये समान कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी भात मर्यादित प्रमाणात आणि कमी प्रमाणात खावा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स ठेवण्यासाठी तांदूळ शिजवताना काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. तांदूळ हळूहळू शिजवा. प्रेशर कुकर ऐवजी दुसऱ्या भांड्यात भात शिजवा आणि पाण्याचे प्रमाण जास्त ठेवा.
पांढरा तांदूळ सर्वोत्तम तांदळांपैकी एक असून, त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, तांदळावर पॉलिश किंवा पांढरा लेप लावल्याने त्यातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात. पांढऱ्या तांदळातील बहुतेक फायबर गिरण्यांमध्ये बफिंग प्रक्रियेत नष्ट होत असतात. तांदूळावरील कोंड्याच्या वरच्या थरामध्ये बहुतेक पोषक घटक असतात, जे दळण्याच्या प्रक्रियेत अनेकदा नष्ट होतात.
ब्राऊन तांदूळ हा संपूर्ण धान्याचा तांदूळ आहे. तपकिरी तांदळाचे फायदे पाहिल्यास, त्यातून फक्त भुसा काढून टाकला जातो, म्हणून त्यात फायबर आणि इतर फायटोकेमिकल्स आणि रिबोफ्लेविन, नियासिन आणि थायामिनसारखी अनेक जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅगनीजसारखी अनेक खनिजेदेखील असतात आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स ५० ते ५५ दरम्यान असतो, तर पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ६४ ते ७० दरम्यान असतो. त्यामुळे रोजच्या आहारात ब्राऊन राइसचा समावेश करणे केव्हाही चांगले.
Health Tips Diabetes Patient Rice Nutrition
Sugar