पुणे – ऋतूमान बदलल्यामुळे किंवा गरम-थंड पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकला, नाकबंद होणे अशा समस्या निर्माण होतात. सर्दी-पडसे झाल्याने आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये डोकेदुखी, अंगदुखीचाही त्रास होतो. काहीही खाण्याची इच्छा राहात नाही. सतत नाक गळत असल्याने काहीच करण्याची इच्छा नसते. यातून सुटका करण्यासाठी तुम्ही अनेक औषधांचे सेवन करतात. पण तुमचे सर्दी-पडसे घालविण्यासाठी घरगुती उपायही आहेत. अशा काही घरगुती उपायांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लवंग
नाकबंद झाल्यास किंवा सर्दी-खोकल्यासारखा त्रास सुरू झाल्यास तुम्ही लवंगांचा वापर करू शकतात. चार-पाच लवंगा तव्यावर भाजून घ्याव्यात त्या फुगल्यांनंतर त्यांचे सेवन करावे. (चावावे)
असे केल्यास तुम्हाला लवकरच परिणाम जाणवेल.
मध आणि मिरे पूड
एका चमच्यात मध घेऊन त्यात थोडी मिर्याची पूड घ्यावी. दोन्ही एकत्र करून त्याचे दररोज रात्री सेवन करावे. पण त्यानंतर पाणी पिऊ नये. हे चाटण तुमची सर्दी बरी करण्यास नक्की मदत करेल.
आले आणि मध
मधाचे सेवन केल्यानंतर घशातील कफ बाहेर टाकण्यास मदत मिळते. त्यासाठी आल्याचे तुकडे करून ते गॅसवर गरम करावे आणि त्याला थोडे चिरून मधात बुडवून ते चावावे असे केल्यास लाभ होईल.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
कोमट पाणी एका ग्लासमध्ये घेऊन त्यामध्ये चमचाभर मीठ टाकावे. त्यानंतर ते चांगले हलवून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर घशातील कफ निघून जातो. जेवण झाल्या झाल्या लगेच गुळण्या करू नये.