मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नारळाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते, कारण या झाडाच्या प्रत्येक भागाचा माणसाच्या जीवनात उपयोग होऊ शकतो. त्यातच कच्चे नारळाचे फळ तर अमृता समान असते, असे म्हटले जाते. कारण या कच्चे नारळ तथा शहाळ्यामध्ये अत्यंत गोड आणि मधुर असे पाणी असते. त्याचप्रमाणे त्याची मलई देखील चवदार आणि पौष्टिक असते. नारळाच्या दुधाची अद्वितीय चव आणि त्याची दाट मलई यामुळे ते जगभरात खवैय्यांच आवडतं तर आहेच , पण करी आणि डेझर्टमध्ये सुद्धा त्याचा मुक्तहस्ते वापर होतो.
शाकाहारी पदार्थात नारळाच्या दुधाचा वापर केला जातो, कारण ते लॅक्टोज मुक्त आहे. नारळाच्या दुधाचे पदार्थ कोकण किनारपट्टी आणि केरळमध्ये होतात. कोकणी पदार्थात बरेच पदार्थ मांसाहारी असतात आणि त्यात नारळ हा त्या चविष्ट पाककृतींमध्ये एक अतिशय महत्वाचा घटक असतो. नारळाचा वापर केल्याशिवाय पारंपारिक पदार्थ अपूर्ण ठरतात, विशेष करून नारळाचं दूध, जे सीफूड डिशेसपासून ताजतवानं करणाऱ्या पेयांपर्यंत सगळीकडे वापरलं जाते.
नारळाच्या दुधाचा उपयोग फक्त अन्नपदार्थांचू चव वाढवणं एवढाच नाही. फार पूर्वीपासून निरोगी केसांसाठी आणि मुलायम त्वचेसाठी ही नारळाच्या दुधाचा वापर केला जातो. नारळाचं दुध आरोग्यदायी नसल्याचा गैरसमज निर्माण केला जात असला तरी, नारळाच्या दुधाच्या ब-याच फायद्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.नारळाच्या दुधात व्हिटॅमिन C, E, B1, B3, B5 आणि B6 तसेच लोह, सेलेनियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात.
नारळाच्या दुधामध्ये दाह-विरोधी प्रतिजैविकं आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत, जे शरीराला बऱ्याच संक्रमणापासून आणि विषाणूंपासून वाचवायला मदत करतात. नारळाच्या दुधात चरबीचं प्रमाण लक्षणीय असतं, परंतु ते बहुतेक लॉरिक अॅसिड सारख्या मध्यम-चेन फॅटी अॅसिडच्या स्वरूपात असतं. नारळाच्या दुधात लॉरिक अॅसिडचे प्रमाण चांगले असते, जे आईच्या दुधात देखील आढळतं. मेंदूचा विकास, हाडांचं आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या लॉरिक अॅसिडचा उपयोग होतो.
नारळाच्या दुधात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं .सकाळी नाश्त्याच्या वेळेस नारळाचं दूध घेतल्यास दिवसभर भूक नियंत्रणात राहाते. मिठाई, खीर करताना नारळाच्या दुधाचा वापर करता येतो. वेगन डाएटच्या निमित्तानं आहारात नारळाच्या दुधाचं महत्व वाढलं आहे. गायी म्हशीच्या दुधाप्रमाणेच नारळाच्या दुधातून शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळतात. तसेच नारळाच्या दुधातून पोषण मिळण्यासोबतच वजन कमी होण्यासही मदत होते.
नारळाच्या दुधामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. ज्यांना गायी- म्हशीच्या/ बकरीच्या दुधाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी नारळाचं दूध सुरक्षित आणि पोषक मानलं जाते. नारळाच्या दुधात उष्मांकाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळेच गायी-म्हशीच्या दुधाऐवजी नारळाचं दूध प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. नारळाच्या दुधानं चयापचय क्रियेचा वेगही वाढतो त्यामुळे नारळाचं दूध वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते.
नारळाच्या दुधानं पचनासंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत होते तसेच इरिटेबल बाउल सिंड्रोम सारख्या आजारातही नारळाचं दूध सेवन करणं फायदेशीर ठरतं. नारळाच्या दुधात जठराला फायदेशीर असे अतिसूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म असतात. गायी म्हशीच्या दुधाप्रमाणे नारळाचं दूधही सेवन करता येतं. तसेच चहा करतानाही नारळाचं दूध वापरता येतं. मिठाई आणि खीर बनवताना नारळाच्या दुधाचा उपयोग करता येतो.
वजन कमी करण्यासाठी नारळाचं दूध घ्यायचं असेल तर त्यात साखर टाकून पिऊ नये. नारळाचं दूध दिवसा विशेषत: सकाळी नाश्त्याच्या वेळेस घेणं फायदेशीर मानलं जातं. नारळाचं दूध सकाळच्या वेळेत घेतलं तर चयापचयाचा वेग वाढतो त्याचा पचन योग्य होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी फायदा होतो. नारळाच्या दुधाचा आहारात समावेश करताना शारीरिक हालचाली, शारीरिक व्यायाम वाढवण्यावरही भर द्यायला हवा.
नारळाचे दूध प्यायल्याने हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत होते. नारळाच्या दुधातील फॅटी अॅसिड रक्तवाहिन्यांमध्ये प्लाकची निर्मिती करणाऱ्या बॅक्टेरियाचा नायनाट करते. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो. सेलॉन मेडिकल जर्नलनुसार, नारळाच्या दुधामध्ये ट्रान्स फॅटी अॅसिड नसून ते ग्लुटेन-फ्री असते व यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे आपल्या शरीराचे हृदयविकारापासून संरक्षण होते. याबरोबरच नारळाच्या दुधामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहून रक्तवाहिन्यांचे संरक्षण होते.
नारळाच्या दुधामधील अँटी-मायक्रोबायल गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. नारळाच्या दुधामधील लोरिक अॅसिडमध्ये अँटि-बॅक्टेरियल व अँटि-वायरल गुणधर्मांमुळे आजार निर्माण करणाऱ्या घटकांचा नायनाट होतो. तसेच नारळाच्या दुधात व्हिटॅमिन सी’ असल्याने रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.
नारळाचे दूध तयार करणे अतिशय सोपे आहे. नारळ खवून त्याचा किस गरम पाण्यात सोडावा. एक भांडे घेऊन त्यावर पातळ कपडा ठेवावा. त्या भांड्यात किस असलेले पाणी ओतावे व किस पिळून टाकून द्यावा. बाजारात मिळणारे नारळाचे दूध वापरले तरी चालेल. दररोज 2 कप नारळाचे दूध आहारात असावे. उन्हाळ्याच्या दिवसांत थंडावा मिळण्यासाठी नारळाच्या दुधात केळे मिसळून खावे. तुम्ही नारळाच्या दुधापासून सोलकढी, सूप किंवा आमटीही बनवू शकता. पाण्यात मिसळलेल्या नारळाच्या दुधामुळे शरीरातील चरबी व कॅलरी घटण्यास मदत होते
Health Tips Coconut Milk Benefits Nutrition Diet
Weight Loss