इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तम वाढीसाठी चौरस आहार घ्यावा, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. हा चौरस आहार घेताना काही नियम पाळायचे असतात. म्हणजे एकाच दिवशी सगळे वातुळ अर्थात गॅस होणारे पदार्थ किंवा पोटाला पचायला जड जातील असे पदार्थ खाऊ नयेत. विरुद्धान्न खाऊ नये. म्हणजे दूध आणि केळ्याची शिकरण आपण आवडीने खातो, पण ती आयुर्वेदात मान्य नाही. कारण, फळे ही दुधासोबत खाऊ नयेत असे म्हणतात.
आपल्या शरीराला काही पदार्थ नीट पचतात. तर काही पदार्थ एकत्र केल्यास ते पदार्थ आपल्याला हानीकारक ठरतात. म्हणूनच प्राचीन काळापासून खाण्यापिण्याच्या काही पद्धती ठरवून दिल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन केले तर अनेक त्रास आपण टाळू शकतो.
आपल्या खाण्यामध्ये दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवजात बालकापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत दूध प्रत्येकाचे एक मुख्य अन्न आहे. कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिनसारखे अनेक पोषक तत्त्वांचा दूध हा प्रमुख स्त्रोत आहे. अनेक लहान मुलं आवडीने दूध पितात. परंतु दूध पिताना मुलांनी त्यासोबत काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. याचे भान पालकांनी ठेवणे आवश्यक आहे.
लहान मुलांना दूधासोबत आंबट फळं, आंबट पदार्थ खायला देऊ नयेत. मोसंबी, संत्री, लिंबू यांसारख्या आंबट फळांमध्ये आम्लाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे दूधातील प्रथिने जमा होतात आणि पचनक्रिया बिघडते. यामुळे गॅस, पोटात पेटके येणे, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे सगळे एकत्र देण्यापेक्षा पालकांनी दूध देण्याऐवजी या फळाचा रस द्यावा.
पालकांनी मुलांना दूधसोबत खारट पदार्थ देणे टाळले पाहिजे. वेफर्स आणि इतर खारट स्नॅक्स हे दूध किंवा चहासोबत खाण्याची अनेकांची सवय असते. मात्र, ते योग्य नाही. हे खारट पदार्थ दुधासोबत खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे दूध पचण्यास अडचणी येतात. अशा परिस्थितीत गॅस्टोइंटेस्टाइनसह इतर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्याऐवजी, एक ग्लास पाणी किंवा फळं, भाज्या यांसारखा निरोगी नाश्ता देऊ शकतात.
लहान मुलांना द्राक्ष आवडतातच. तुम्ही जर द्राक्षे खाल्ली असतील तर त्यानंतर तासभर दूध पिणे टाळा. यामागील कारण म्हणजे दुधातील प्रोटीन द्राक्षातील आम्लाच्या तसेच व्हिटॅमिन सी च्या संपर्कात आल्यावर आंबते. या विरुद्ध अन्नामुळे मुलांना त्रास होऊ शकतो.
Health Tips Children’s Milk Food Items