मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
चवळी ही एक शेंग भाजी असून याची उसळ करतात. त्यातील दाण्यांना चवळीचे दाणे अथवा नुसते ‘चवळी’ असे म्हणतात. हे एक प्रकारचे द्विदल धान्य आहे. त्याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. ते दाणे वाळल्यावर त्यावर एक काळ्या डोळ्यासारखी खूण दिसते म्हणून याला इंग्रजीत ब्लॅक-आईड पी काळा-डोळा असणारे दाणे असे म्हणतात.
चवळीच्या कोवळ्या शेंगा मोडून त्याची भाजी केली जाते. या शेंगांतील दाणे भरले, की त्या सोलून ओल्या दाण्यांची उसळ केली जाते, तर वाळलेल्या चवळीचे दाणे कडधान्य म्हणून वापरले जातात. हे दाणे गोलसर, टपोरे आणि पांढरट रंगाचे असतात. बारीक आकाराच्या गावरान चवळीला उत्तम चव असते, तर हायब्रीड चवळीचा दाणा खूप मोठा असतो.
चवळी ही बहुतेक सर्व देशांत खाल्ली जाते. चवळीच्या दाण्यावर एका बाजूला काळ्या डोळ्यासारखी खूण असते, त्यामुळे चवळीला ‘ब्लॅक आईड पी’ असे म्हटले जाते. युरोपमध्ये व अरब देशांत हे कडधान्य खूप वापरतात. तिथे त्यापासून सॅलड, सूप, कटलेट असे पदार्थ बनवले जातात. ‘फलाफल’ हा प्रसिद्ध इजिप्शियन पदार्थ चवळीपासून बनवलेला असतो. आपल्याकडे चवळी भिजवून तिला मोड आणून उसळ, आमटी, भात असे पदार्थ केले जातात.
चवळी ही शेंगवर्गातील भाजी असून, महाराष्ट्रात सर्व भागातून तिची लागवड केली जाते. चवळीचा सालीसकट कोवळ्या शेंगा व कोवळे दाणे, तसेच पूर्ण वाळलेले दाणे अशा स्वरूपात भाजीत, आमटीत व उसळीत वापर करतात. काही ठिकाणी कोवळे कोंब पानासकट खड्न त्यांची भाजी केली जाते. झाडांचा वापर जनावरांना चारा म्हणूनही केला जातो.
भाजीचे पीक म्हणून चवळीची लागवड मोठ्या शहरांच्या आसपास आणि ग्रामीण भागात मर्यादित स्वरूपात होते. कडधान्य म्हणूनसुद्धा चवळीची लागवड होते. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांतून चवळीची थोड्याफार प्रमाणात लागवड केली जाते. सलग मोठ्या क्षेत्रात व्यापारी तत्त्वावर चवळीची लागवड सध्या करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८ हजार हेक्टर क्षेत्र चवळीच्या लागवडीखाली असून एकूण उत्पादन ३२ते ३५ हजार मे. टन आहे.
चवळी-दाणे यातील काळा डोळा दिसण्यात अमेरिकेत याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. त्याचा रंग व आकारही वेगवेगळा असतो. त्याच्या डोळ्याचा रंगही काळा, कथ्था, लाल, गुलाबी अथवा हिरवाही असू शकतो. या शेंगेतील दाणे शेंग ताजी असतांना हिरवेच असतात, पण वाळल्यावर त्याचा रंग बदलतो. याच्या बीया एक कडधान्य असल्यामुळे वाळलेल्या बिया भिजवून, मोड आल्यावर, त्याची उसळ करतात.
ठराविक भाज्या खाण्याचा कंटाळा आला की गृहिणी अशा वेळी एखादी कडधान्याची उसळ किंवा त्यापासून तयार केलेला चटपटीत पदार्थ मुलांच्या पानात वाढतात. विशेष म्हणजे अनेक लहान मुलांना कडधान्य आवडतात. मात्र, यामध्येदेखील मटकी, मूग, वटाणे ही कडधान्य अधिक खाल्ली जातात. त्याच्या तुलनेत चवळी फारशी खाल्ली जात नाही. परंतु, चवळी खाण्याचे अनेक फायदे असून ती शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याचं सांगण्यात येते. चवळी खाण्याचे खूप फायदे आहेत.
चवळीचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. वजन कमी करण्यासाठीदेखील चवळी खाणे योग्य ठरते. उकडलेली चवळी अथवा चवळीची उसळ खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले रहाते. चवळीत भरपूर प्रमाणात सोल्युबल फायबर्स असल्यामुळे पचनशक्ती सुधारते; तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी चवळी खाल्यास पोट साफ होते. चवळी मधुमेहावर अतिशय गुणकारी आहे. त्यात असलेली प्रथिने रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करण्यास मदत करतात व शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.
कडधान्य चवळी हे गरोदर स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक आहे. गरोदरपणात होणारी कॅल्शियमची झीज व लोहाची कमतरता चवळीच्या सेवनामुळे भरून निघते, पोटातील बाळाची चांगली वाढ होऊन प्रसूतीनंतर मातेला दूध येण्यास मदत होते. चवळीतील या गुणधर्मामुळे आहारतज्ज्ञांच्या मते आपल्या आहारात तिचा जास्तीत जास्त वापर करावा. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दूर होतो.
शरीराला आवश्यक असणारी नैसर्गिक ऊर्जा मिळते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. घसा सुजल्यास चवळीची पानं पाण्यात टाकून ते उकळवावी. त्यानंतर या पाण्याने गुळण्या कराव्यात, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
Health Tips Chawali Diet Nutrition Benefits