इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाव अर्थात ब्रेड हा आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. ब्रेडशिवाय अनेक घरात सकाळचा नाश्ता, मुलांचा डबा तयार होत नाही. या सगळ्यासाठी ब्रेडलाच प्राधान्य दिलं जातं. सहज उपलब्ध असणारा आणि सगळ्यात सोयीचा असा प्रकार असल्याने तो तेवढाच लोकप्रिय देखील आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की ब्रेड हा हलका नाश्ता आहे आणि तो पोटात सहज पचतो. हे खरं आहे का, हेच आपण पाहणार आहोत.
उपाशी पोटी पाव कधीच खाऊ नका
तुम्हाला पाव आवडत असेल तर नक्की खा, पण कधीही सकाळी उपाशीपोटी पाव खाऊ नये. कारण रिकाम्या पोटी ब्रेड खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. याचा अर्थ ब्रेड वाईट आहे, असा होतो का, तर नाही. कारण अनेक आहारतज्ञ नाश्त्यात ब्रेडचा समावेश करण्यास सांगतात. मात्र तो व्हाईट ब्रेड नसतो तर मल्टी-ग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड असतो.
रिकाम्या पोटी ब्रेडचे सेवन केल्याने तब्येतीला त्रास होऊ शकतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका
रिकाम्या पोटी ब्रेड खात असाल तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्याचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. ब्रेडमध्ये अमायलोपेक्टिन ए असते ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. त्यामुळेच ब्रेड रोज खाण्याचा फटका बसू शकतो. यामुळे मधुमेह, किडनी स्टोन आणि हृदयविकारही उद्भवू शकतात. ब्रेडमुळे वाईट कोलेस्ट्रॉलही वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवू शकतो.
वजन वाढण्याचा धोका
रोज ब्रेड खाल्ल्याने वजन वाढू लागते. याची सुरुवात बद्धकोष्ठतेपासून होते. त्यानंतर शरीरात प्रोटीन आणि फॅट जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे वजन वाढू लागते. व्हाईट ब्रेड हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.
ब्रेडमध्ये पोषक घटक
कॅलरीज: ८२
प्रथिने: ४ ग्रॅम
एकूण चरबी: १ ग्रॅम
चरबी: ० ग्रॅम
कर्बोदक: १४ ग्रॅम
फायबर: २ ग्रॅम
साखर: १ ग्रॅम