मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला ‘आर्थरायटीस’ किंवा संधिवात म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची नाकारता येत नाही. संधिवातामध्ये सांधे, सांध्यांच्या आसपास असणाऱ्या पेशी, आणि इतर कनेक्टिव्ह पेशींना इजा होते. सध्या संधिवात किंवा सांध्यांचे दुखणे हा बहुसंख्यांना भेडसावणारा विकार झाला आहे. शिवाय एका विशिष्ट वयात तो होतो, असेही नाही. या विकारात अनेक सांध्यांना एकाच वेळी त्रास होतो. त्यामुळे दैनंदिन हालचाली व शारीरिक क्रिया सामान्यपणे करता येणे कठीण जाते.
कार्यालयात दीर्घ काळ बैठे काम केल्याने शरीरात ताठरपणा येत असेल, पायऱ्या चढताना त्रास होत असेल, तर संधिवाताची शक्यता असते. त्यामुळे नियमित व्यायाम गरजेचा असतो. अस्थिरोगतज्ज्ञांशी चर्चा करून दिर्घकाळ व्यायाम किंवा उपचार पद्धत आखून घ्या, शरीराची हालचाल करत रहा. काम थांबवू नका. तीव्र वेदना होत असतील तरी देखील व्यायाम आणि रोजची काम सुरू ठेवावा. रोज थोडा वॉक, स्ट्रेचिंग आणि स्नायूंना बळकट करण्याचा प्रयत्न करावा.
याशिवाय त्यासह आपली शारीरिक क्षमता चांगली ठेवण्यासाठी व सांध्यांच्या आरोग्यासाठी अन्नसेवनाची पथ्ये पाळणेही गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अनेक कारणांमुळे संधिवात निर्माण होतो. संधिवाताला ‘सांधेदुखी’ असेही म्हणतात. सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेजमुळे सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्यांमधील हाडे एकमेकांना घासली जातात. त्यामुळे गुडघ्यात सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ‘ऑस्टिओआर्थ्रायटिस’ असे म्हटले जाते. साधारणपणे वाढत्या वयानुसार कार्टिलेजची क्षमता कमी होते, झीज वाढत जाते.
संधिवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक आहे. सांधे दुखणे, सांध्यांची हालचाल योग्य पद्धतीने न होणे; तसेच चालताना, वाकताना, उठताना, बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे यात वेदना निर्माण होतात. ही सर्व लक्षणे उतारवयात वेदना निर्माण करणारी आहेत.
वाढत्या वयामुळे संधिवाताचा त्रास होतो. साधारणतः ६० वर्षांनंतर हा त्रास वाढता असल्याचे दिसून येते. लठ्ठपणामुळे संधिवात होण्याचे प्रमाण वाढते. वाढलेल्या वजनाचा अतिरिक्त भार हा गुडघ्यावर, खुब्याच्या सांध्यावर पडत असतो. व्यायामाचा अभाव असल्यास कार्टिलेजची क्षमता कमी होते. हाडाचे फ्रॅक्चर असल्यास हा त्रास वाढतो.
दोन सांध्यांमध्ये गॅप असल्यास ही स्थिती निर्माण होते. शरीरातील संप्रेरकांतील (हार्मोनल) बदल, रजोनिवृत्ती यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांत ऑस्टिओआर्थ्रायटिस होण्याची शक्यता अधिक असते. अनुवांशिकतेनेही हा होऊ शकतो. सांधेदुखी, सांध्यांवर सूज येणे, सांधा बाहेरून लाल होणे, सांध्यास स्पर्श केल्यास गरम लागणे व त्या वेळी वेदना होणे, सांध्याची हालचाल योग्य प्रकारे न होणे, सांधे जखडणे, अवघडणे, विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर सांधे अवघडल्यासारखे होणे, सांध्यातून कटकट असा आवाज येणे, खूप दिवसांचा संधिवात असेल, तर सांधे वेडेवाकडे होणे असे प्रकार घडतात. संधिवातामध्ये रुग्णाच्या कुटुंबात पूर्वी हा त्रास असल्यास; तसेच शारीरिक तपासणीद्वारे निदान केले जाते. सांध्याचे एक्स रे व युरिक अॅसिड, एमआरआय स्कॅन या चाचण्या केल्या जातात. सांधेदुखीवर वेळीच योग्य उपचार न केल्यास हा त्रास वाढू शकतो.
हे आवर्जून करावा
– संतुलित आहार घ्यावा
– लठ्ठपणामुळे गुडघ्यासारख्या सांध्यावर अधिक ताण येतो. यासाठी वजन आटोक्यात ठेवणे
– नियमित व्यायाम, योगासने करावीत, चालणे, सायकलिंग, पोहणे असे व्यायाम करावेत.
– हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.
संधिवातात सांध्यांभोवती सूज येते. तेथे वेदना होतात. कडकपणा जाणवतो. येथील सूज दीर्घ काळ राहते किंवा ओसरून पुन्हा येते. त्यामुळे या भागातील उतींचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची जोखीम असते. अशा वेळी आहारात बदल केला, तर ही लक्षणे सौम्य होण्यास मदत होते. म्हणूनच संधिवाताच्या रुग्णांनी काही आहार टाळायला हवा.
संधिवाताच्या रुग्णांनी युरिक आम्ल वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे. त्यात काही प्रकारचे मासे, शिंपले, कॉड फिश, मटणाचे अतिसेवन टाळावे. त्यामुळे शरीरात युरिक आम्लाची मात्रा वाढून संधिवाताचा त्रास होऊ शकतो. संधिवाताच्या रुग्णांनी रिफाइन्ड साखर, रिफाइन्ड पीठ, रिफाइन्ड तेल, प्रक्रियायुक्त मटण, मोनोसोडियम ग्लूटामेट किंवा सोडियम ग्लूटामेट असलेले चीज-टोमॅटो, प्रथिन पूरके टाळावीत. त्यामुळे सांध्यांना सूज येते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.
Health Tips Arthritis Disease Dos Don’ts Precaution
Diet Food Nutrition