इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात विविध पौष्टिक गोष्टींचा समावेश करणे योग्य ठरते. प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स समृध्द अन्न निरोगी ठेवतात आणि अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
जेव्हा बहुतांश जण पौष्टिक आहाराचा विचार करतात तेव्हा नागरिकांच्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे मांसाहार. आहार अभ्यास देखील स्पष्ट करतात की, प्राणी-आधारित आहारामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे जास्त असतात. पण यातही, काही गोष्टींबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषत: लाल मांसाच्या अतिसेवनामुळे आजार होतात.
लाल मांस हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते. त्याचे सेवन केल्याने, अशी अनेक पोषक तत्त्वे शरीरात सहज पुरवली जाऊ शकतात, जी वनस्पती-आधारित अन्नातून मिळणे फार कठीण मानले जाते. पण लाल मांस जास्त प्रमाणात खाण्याची सवय देखील समस्या वाढवू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे नागरिक जास्त लाल मांसाचे सेवन करतात त्यांच्यामध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे त्याचे नियंत्रित सेवनच केले पाहिजे. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घेऊया रेड मीटपासून होणारे काही आरोग्य धोके आहेत.
आरोग्य शास्त्र अभ्यास दर्शविते की, जे नागरिक जास्त लाल मांस खातात त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो. लाल आणि प्रक्रिया केलेले मांस दोन्ही खाल्ल्याने हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक जास्त लाल मांस खातात त्यांच्या आतड्यातील बॅक्टेरिया कमी होतात. याशिवाय, अशा नागरिकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका देखील खूप जास्त असू शकतो, तसेच हृदयविकाराचे मुख्य कारण मानले जाते.
काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, लाल मांसामुळे कोलन आणि रेक्टल कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्याचे जास्त सेवन प्रोस्टेट आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी जोखीम घटक म्हणून देखील पाहिले जाते. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी लोकांनी लाल मांसाऐवजी चिकन आणि वनस्पतीजन्य पदार्थ खाण्यावर भर दिला पाहिजे.
काही प्रमाणातही लाल मांस वारंवार खाण्याची सवय मधुमेहाचा धोका वाढवू शकते. 2020 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज फक्त 50 ग्रॅम लाल मांस खाल्ल्याने मधुमेहाचा धोका 11 टक्क्यांनी वाढू शकतो. याव्यतिरिक्त, मधुमेह असलेल्या लोकांना प्रक्रिया केलेले मांस खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. लाल मांस रक्तातील साखरेची पातळी प्रभावित करू शकते.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लाल मांस आणि प्राण्यांवर आधारित खाद्यपदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे काही लोकांमध्ये अल्फा-गॅल सिंड्रोम नावाची ऍलर्जीची समस्या असू शकते. काही परिस्थितींमध्ये ही ऍलर्जी घातक असल्याचे अभ्यासांनी दर्शविले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लाल मांस खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर ते टाळावे.