भोपाळ (मध्य प्रदेश) – डॉक्टरांकडून रुग्णांना वेगवेगळ्या आजारांसाठी अँटिबायोटिक औषधे लिहून दिली जातात. परंतु या औषधांचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात याबद्दल सामान्यांना काहीच माहिती नसते. कदाचित रुग्णांवर दुष्परिणामही होऊ शकतात. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. परंतु त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. ती करणे आवश्यक असल्याचे डब्ल्यूएचओच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अँटिबायोटिक औषधांचा परिणाम कमी झाल्यास मोठ्या त्रासाला सामोर जावे लागण्याची शक्यता असते. याबद्दल नागरिकांना ठाऊक नसते. रुग्णांना अँटिबायोटिक देण्यापूर्वी सर्वप्रथम त्यांचे कल्चर टेस्ट कोणत्याही परिस्थिती करणे आवश्यक आहे. याने संबंधित रुग्णावर कोणत्या औषधाचा परिणाम होतो हे समजणे सोपे जाईल. त्यानुसारच त्यांना औषधे लिहून दिली जातील. परंतु ही सुविधा प्रत्येक रुग्णालयात नसल्याने अडचणी येऊ शकतात, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील अँटिमायक्रोबॉयल रेजिस्टन्सचे तज्ज्ञ डॉक्टर अनुज शर्मा यांनी दिली.
डॉ. अनुज शर्मा सांगतात, रुग्णालयात रुग्णांना होणार्या संसर्गाचा मोठा धोका असतो. त्याला रोखण्यासाठी देशभरात इन्फेक्शन प्रिव्हेंशन अँड कंट्रोल कार्यक्रम राबविला जात आहे. संसर्गाला रोखण्यासाठी काय करावे यासंदर्भात देशातील सर्व कर्मचार्यांना प्रशिक्षित केले जात आहे. कल्चर टेस्ट केल्यानंतरच रुग्णांना अँटिबायोटिक औषध लिहिण्याचा सल्ला सर्व डॉक्टरांना दिला जात आहे. कोणत्या आजारावर कोणते औषध द्यावे याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आधीच मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यावर कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
भोपाळमध्ये झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत डॉ. शर्मा सहभागी झाले होते. राष्ट्रीय आरोग्य मिशनतर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक डॉ. पंकज शुक्ला म्हणाले, रुग्णालयांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी प्रभावी धोरण तयार करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत इंडियन मेडिकल असोसिएशन नर्सिंग होम असोसिएशन आणि खासगी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांचे सल्ले घेऊन एक धोरण ठरविण्यात येणार आहे.