मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या ताणतणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच बहुतांश जणांना गॅसेस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. काही वेळा त्याकडे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र ती हृदयविकाराची प्राथमिक लक्षणेही असू शकतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे कधीही फायद्याचे आणि योग्य ठरते आहे.
गॅस, ॲसिडिटीचा त्रास कमी होऊन पोट नेहमी साफ राहात नाही, या उलट पोटाला फुगारा येणं, ढेकर येणं, आंबट पाणी घशात येणं अशा लक्षणांनी अनेकदा आपण अस्वस्थ होतो. जेवणानंतर तोंडाद्वारे नकळत वायू निघून जाणं हे पूर्णपणे स्वाभाविक असतं. जेवताना अन्नाबरोबर गिळल्या गेलेली हवा जठर रिकामे होताना तोंडाद्वारे निघते. त्यानंतर आपल्याला बरं वाटतं. ही क्रिया प्रत्येक माणूस कमी जास्त प्रमाणात अनुभवतो. याचसाठी जेवणानंतर लगेच झोपू अथवा बसू नये. थोडे चालावे, वायू जठरामध्ये वा आतडीमध्ये जमा होतो तेव्हा पोटाला फुगारा येतो.
जेवणातील पिष्टमय पदार्थ, जसं गहू, बटाटे, डाळी याशिवाय कडधान्ये, शेंगदाणे यांचं व्यवस्थित पचन न झाल्या मुळे देखील आतडीत जास्त वायू तयार होतो. आतडीमध्ये जिवाणूंचं प्रमाण वाढण्यास देखील हा त्रास वाढू शकतो. कधी-कधी काही पोटाच्या विकारांमध्ये आतड्यांची हालचाल मंदावते व त्यामुळे वायू आतडीत जमा होतो. काही आतड्यांच्या आजारांमध्ये आतड्यांचा अवरोध (ऑब्स्ट्रॅक्शन) होतो. त्यामुळे पोट फुगणं, पोट दुखणं, गॅस न निघणं असा त्रास होतो.
अनेकदा पोट भरलेले आणि घट्ट वाटते, अनेकदा गॅसमुळे हे खूप त्रास देऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्या दिवसाची सुरुवात पौष्टिक आहार आणि सकस आहाराने करणे योग्य आहे. अपचन, गॅस किंवा फुगणे यासारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमुळे त्रास होत असल्यास नाश्त्याचे काही प्रकार आहारात समाविष्ट करायला हवेत. जिरे पाचन विकार, अतिसार, अपचन, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी करण्यासाठी कार्य करतात. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने तुमची सूज बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
एक वाटी गरम ओट्स आणि केळी तुमच्या पोटासाठी आरोग्यदायी असू शकतात. केळ्यामध्ये फायबर असते, जे पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास सक्षम करते. तसेच, फायबर अन्नाचे पचन योग्य प्रकारे करते आणि आतड्याची हालचाल सुलभ करते. याशिवाय फायबर पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी देखील ओळखले जाते. यासोबतच ओट्स देखील पचण्याजोगे अन्नाच्या श्रेणीत ठेवले जातात.
राज्यात बाजरी अनेकांचे मुख्य अन्न आहे बाजरीची भाकरी सर्वांनाच आवडते. बाजरीत भरपूर फायबर आढळते. जे तुमच्या पचनसंस्थेला चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. आणि बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील कार्य करते. तसेच शरीरातील पोषक तत्वे टिकून राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात पपेन नावाचे नैसर्गिक पाचक एंझाइम असते, जे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि गॅस यांसारख्या लक्षणांपासून आराम देते. अशा स्थितीत हे सॅलेड आपण दररोज नाश्ता पर्याय म्हणून वापरू शकता.
गॅस प्रमाणे अॅसिडिटी हादेखील प्रत्येकालाच कधी ना कधी सतावणारा त्रास आहे. आपल्या जठरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी निसर्गतःच हायड्रोक्लोरिक अॅसिड व अनेक पोषक द्रव्यांची उत्पत्ती होते. जेव्हा काही कारणांमुळे हे अॅसिड जास्त प्रमाणात तयार होतं, तेव्हा आपल्याला पोटाच्या वरील भागात जळजळ होणं, दुखणं अथवा मळमळ वा उलटी होणं तसंच क्वचित प्रसंगी उलटीतून रक्त पडणं अशी लक्षणं दिसू शकतात. जास्त अॅसिड्स तयार होण्यासाठी तिखट, मसल्याचे व तेलकट पदार्थ, चहा-कॉफी, अल्कोहोल सेवन, अॅस्पिरिनसारख्या वेदनाशामक गोळ्या कारणीभूत ठरतात.
अतिखाणं, लठ्ठपणा, जागरण व आजकालचं ताणतणावाचं जीवनमान यांनी यात भरच घातली आहे. तेव्हा या सर्व खाण्याच्या सवयी आणि आपली जीवनशैली संतुलित व तणावरहित करण्याचा प्रयत्न करणं हाच अॅसिडिटीपासून बचावाचा सर्वोत्तम उपाय आहे. अॅसिडिटीला वेळीच आवर घातला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जठराला आतून सुरक्षित ठेवण्याकरता पातळ आवरण असतं. अॅसिडच्या जास्त प्रमाणामुळे या आवरणाला इजा होऊ शकते, जखमा होऊ शकतात, त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक ठरते.
Health Tips Acidity Gases Home Remedies Nutrition