मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या काळात प्रत्येक जण आपआपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. तरीही काही आजार होतच असतात, आपल्याला कोणताही आजार होऊ नये आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून योगासन हे उत्तम साधन आहे.
योगासनामुळे आरोग्य चांगले राहते. तणावपूर्ण जीवनशैली आणि असंतुलित खाण्याच्या सवयीमुळे अॅसिडिटी आणि गॅसची समस्या यासारख्या पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. आज बहुतेक जण या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना आराम मिळण्यासाठी अनेकवेळा औषधांचा उपयोग करावा लागतो.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका वैद्यकीय संशोधनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ध्यान आणि योगासने केल्याने अॅसिडिटी आणि गॅस सारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या योगामुळे व्यक्तीला अॅसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळतो.
हलासन
हलासन करण्यासाठी, सर्वप्रथम, आपल्या पाठीवर झोपा आणि तळवे शरीराच्या शेजारी जमिनीवर ठेवा. पोटाच्या स्नायूंचा वापर करून, तुमचे पाय 90 अंशांपर्यंत वर वाढवा. तळवे जमिनीवर घट्ट दाबा आणि पाय डोक्याच्या मागे पडू द्या. मधल्या आणि खालच्या पाठीचा भाग वर उचलण्याची तयारी करा, जेणेकरून पायाची बोटे पाठीच्या पृष्ठभागाला स्पर्श करतील. छाती शक्य तितक्या हनुवटीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. हलासनामुळे अॅसिडिटी आणि गॅसपासून आराम मिळतो. हे आसन करताना शरीर नांगरासारखे दिसते त्यामुळे या आसनाला हलासन असे म्हणतात. हलासन बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर पचन समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
हलासन करताना घ्या ही खबरदारी-
मासिक पाळी दरम्यान महिलांनी हे सोपे करू नये. मानेला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली असेल तरीही हलासन करणे टाळा. गर्भवती महिलांनी हे आसन टाळावे. ग्रीवा किंवा मणक्याशी संबंधित समस्या असली तरीही हलासनाचा सराव करू नका.
वज्रासन
वज्रासनाला इंग्रजीत डायमंड पोज म्हणतात. गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी वज्रासन फायदेशीर ठरू शकते. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की शरीरातील रक्तप्रवाह वाढवून बद्धकोष्ठता, आम्लपित्त, मूळव्याध, आतड्यांतील वायू इत्यादीपासून आराम मिळतो.
वज्रासन करताना घ्या ही खबरदारी-
गुडघे आणि पाय दुखत असल्यास हे आसन करू नये. हायपोटेन्शन म्हणजेच कमी रक्तदाब असलेल्यांनी वज्रासन करू नये.
गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली असली तरी हे आसन करणे टाळा. गर्भवती महिलांनी हे आसन करू नये. मणक्यामध्ये समस्या असल्यास हे आसन करू नका.
उस्त्रासन
उस्ट्रासनाला इंग्रजीत कॅमल पोज असे म्हणतात. अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर उस्त्रासन हा एक प्रभावी उपचार मानला जाऊ शकतो. हे आसन केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
उस्त्रासन करताना घ्या ही खबरदारी-
हर्निया आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे आसन करणे टाळावे. कोणत्याही प्रकारचा त्रास होत असला तरीही हे आसन करू नका.
पवनमुक्तासन
पवनमुक्तासन केल्याने अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो. हे आसन नियमित केल्याने मलप्रक्रिया सुधारण्यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
पवनमुक्तासन करताना घ्या ही खबरदारी- पाठ आणि कंबरेत दुखत असेल किंवा दुखापत असेल तर हा योग करणे टाळावे. जेवणानंतर हे योगासन अजिबात करू नका.