पुणे – चहा हे जणू काही आजच्या काळातील अमृत पेय मानले जाते. सकाळी झोपेतून उठल्यावर अनेक लोकांना चहाची तलफ लागते. त्यामुळे चहा प्यायल्याशिवाय त्याची दैनंदिन दिनचर्या अपूर्ण वाटते. परंतु काही लोक सकाळी चहा किंवा कॉफी ऐवजी केवळ दूध किंवा पाणी पिणे पसंत करतात. मात्र साध्या चहा ऐवजी आयुर्वेदिक पदार्थांपासून बनलेला चहा पिणे शरीरासाठी निश्चितच आरोग्यदायी ठरणार आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, चहा किंवा कॉफीमध्ये आढळणारे टॅनिन, कॅफीन पोटात गॅस तयार करते. कारण सकाळी शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. त्यामुळे केस देखील पांढरे होऊ लागतात. सकाळी जास्त चहा प्यायल्याने लवकर वृद्धत्व येते. अशा परिस्थितीत जर चहा पिणे फार आवश्यक असेल तर सकाळी आपण चहा आणि कॉफीचे काही पर्याय तयार करू शकतो. निसर्गोपचार तज्ज्ञांनी पाच प्रकारचे चहाचे पर्याय दिले आहेत. या पाच प्रकारच्या चहाचे खूप सारे फायदे जाणून घेऊ या…
तुळशीच्या पानांचा चहा
कोरोनाच्या काळात अनेक लोक तुळशीचा काढा पीत होते. तुळशीचा चहा बनवण्यासाठी तुळशीची चांगली पाने आवश्यक असतात. यासोबत अद्रक किंवा आले, बडीशेप, काळी मिरी, वेलची बारीक करून उकळत्या पाण्यात टाकावी. मग त्यानंतर तो गाळून थोडा गार करून प्यावा.
अद्रक किंवा आले चहा
आपल्याला जर वात, पित्ताची समस्या असेल तर तो एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा आल्याचा रस, अर्ध्या लिंबाचा रस मिसळून नेहमीच्या चहाप्रमाणे तो पिऊ शकतो.
ओवा किंवा अजवाईनचा चहा
फुफ्फुसांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर आपण अजवाईन चहा बनवू शकता. ओवा ही उपयुक्त अशी वनस्पती उकळत्या पाण्यात ठेवा. त्यानंतर पाच मिनिटे उकळवा. हा चहा पिताना आपण त्यात थोडे मध टाकू शकता.
पुदीना चहा
एखाद्या व्यक्तीला पचनाची समस्या असेल तर त्यावर पुदीना चहा खूप उपयुक्त ठरू शकतो. पुदीना, आले, ओवाची पाने पाण्यात घालून उकळा, त्यानंतर त्यात दूध आणि साखर घालून ते प्यावे.
हर्बल टी
सर्दी, खोकला, सर्दी, श्वास लागणे इत्यादी बरे करण्यासाठी हर्बल चहाचे सेवन करता येते. त्यात तुळस, आले, वेलची, एका नवीन छोट्या प्रकारची बडीशेप, तमालपत्र, दालचिनी समान प्रमाणात मिसळून उकळत्या पाण्यात टाकावे. सदर हे पेय साखर किंवा मध घालून पिऊ शकता.