उस्मानाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयास सायंकाळी भेट देवून विविध विभागाची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रजनन व बालसंगोपन अधिकारी डॉ. शशिकांत मिटकरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे-गवळी, डॉ. सुधीर सोनटक्के आदी उपस्थित होते.
प्रधान सचिव श्री. खंदारे यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या.जिल्हा स्त्री रूग्णालयात उपचार व प्रसुतीसाठी येणार्या महिला रूग्णांची संख्या लक्षात घेवून आंतररूग्ण विभाग अद्ययावत करण्याबाबत खंदारे यांनी सूचना केल्या. तसेच आवश्यक त्या बाबींसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.
यावेळी जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता गवळी यांनी सांगितले की, एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ४५०० गर्भवती महिला प्रसूत झाल्या. यात २८०० महिलांची नैसर्गिकरित्या तर १७०० महिलांची सिझेरियन प्रसूती झाली आहे. याच कालावधीत कावीळ, प्रसूती काळ पूर्ण होण्याअगोदरच जन्मलेल्या ९०० बालकांची उत्तमरित्या काळजी घेण्यात आली आहे. स्त्री रूग्णालयात सुमन, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना यांची माहिती देण्यात आली. सध्या दररोज सरासरी आंतररूग्ण विभागात २०० महिला रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
रूग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, अतिजोखम ‘आयसीयू’ व ‘एनआयसीयू’ या विभागात माता व बालकांना उपचार देण्यात आले. स्त्री रूग्णालयाला राष्ट्रीय लक्ष्य या अभियानात प्रमाणित असल्याने खंदारे यांनी समाधान व्यक्त करून जिल्हा शासकीय स्त्री रूग्णालयात उपचार घेणाऱ्या व प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला रूग्णांची संख्या वाढू लागल्याने त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी १०० खाटांची सुविधा असलेले माता व बाल रूग्णालय देण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. नायकल, डॉ. मिनियार, डॉ. मिटकरी, डॉ. आयेशा, अधिपरिचारिका मराठे, परिचारिका भंडारी, संजय मुंडे, मस्के, गुळवे, आदी उपस्थित होते.
Health Principal Secretary Visit Women Hospital
Sanjay Khandare