परभणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औषध घेताना नेहमी त्यावरचे नाव वाचावे आणि नंतरच ते घ्यावे, अशी सूचना डॉक्टर मंडळी कायमच देत असतात. मात्र तरीही चुकीची गोळी घेतल्याने जीव गमावल्याच्या अनेक घटना घडत असतात. नजरचुकीने बीपीच्या ऐवजी उंदीर मारण्याचे औषध घेतल्याने एका महिलेचा जीव घेतल्याची घटना अलीकडेच घडली.
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एका छोट्या गावात ही घटना घडली. एका महिलेने नजरचुकीने उंदीर मारण्याची गोळी घेतल्यानंतर तिला जीव गमवावा लागला. वालूर नावाच्या छोट्या गावात ही घटना घडली. प्रियंका संतोष टेकाळे असे या महिलेचे नाव असून उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. सुरवातीला महिलेला परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी परभणीहून छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. मात्र संभाजीनगला नेत असताना वाटेतच महिलेची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्रियंका टेकाळे यांना उच्च रक्तदाब या आजाराचा त्रास असल्याने त्या नियमितपणे औषध घेत होत्या. ४ एप्रिलच्या सायंकाळी या महिलेने बीपीचे नियमित ओषध समजून नजरचुकीने उंदीर मारण्याच्या गोळ्या घेतल्या. दरम्यान, काही वेळाने प्रियंका यांना वांती आली आणि त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ वालूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
काळजी घेतलीच पाहिजे
घरात एकापेक्षा जास्त लोक राहात असतील तर प्रत्येकाचे कुठले ना कुठले औषध असतेच. याशिवाय उंदीर मारण्याचे, फवारणीचे औषधही अनेकांच्या घरात ठेवलेले असते. पण आपला नियमीत वावर असलेल्या खोल्यांमध्ये ही औषधे ठेवणे धोकादायक ठरू शकते. एक नजरचूक जीवावर बेतू शकते. त्यामुळे घरातील प्रत्येकाने याबाबतीत काळजी घेतलीच पाहिजे.
Health Parbhani Women Wrong Medicine