नवी दिल्ली – कोरोना महामारीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने देशभरात लशीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये सर्व स्तरातील लोकांना लशीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के लोकांचे लसीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहेत. परंतु अद्यापही अनेक लोकांना दुसरा डोस भेटलेलो नाही, तर काहींना तर पहिला डोस देखील मिळालेला नाही. परंतु ज्यांना डोस मिळालेला आलेला आहे, त्यातील काही लोकांना या लशीकरणाचा थोडासा त्रास झालेला दिसून येतो, असे आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे, मात्र अशा लोकांची संख्या अत्यंत नगण्य आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.
कोरोना लशीकरणानंतर लाभार्थ्यांमध्ये दिसणाऱ्या दुष्परिणामांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, अभ्यासासाठी निवडलेल्या ८८ जणांपैकी ६१ प्रकरणांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसून आले परंतु यातील ३७ लाभार्थ्यांचे लशीच्या संबंधित दुष्परिणाम होते. तसेच आतापर्यंत एकूण ५ लोकांचे मृत्यू झाले आहेत, परंतु हे मृत्यू थेट लशीच्या संबंधित नाहीत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा पाचवा अॅडव्हान्स इव्हेंट्स फॉर इम्युनायझेशन अहवाल जारी केला आहे. दि. १६ जानेवारी, भारतात लसीकरण मोहिम सुरू झाली, तेव्हापासून दि. ३० मार्च दरम्यान ८८ लाभार्थ्यांच्या डेटावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या कालावधीत देशभरात एकूण ६ कोटी ४० लाख डोस दिले गेले. त्यात ५ जणांचा मृत्यू वगळता, गंभीर आणि अत्यंत तीव्र प्रतिक्रिया असलेले इतर सर्व रुग्ण आता बरे झाले आहेत.
या अहवालानुसार, ३ मृत्यू अपघाती होते आणि लशीकरणाशी संबंधित नव्हते. म्हणजेच तपासादरम्यान या मृत्यूंचे खरे कारण दुसरे काहीतरी असल्याचे दिसून आले. उर्वरित २ मृत्यूंचे कारण तज्ज्ञांनी अनिश्चित म्हणून दिले आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत देशात कोविड -१९ लसीचा एकूण डोस ७१ कोटी ओलांडला गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, भारताला १० कोटी लशीपर्यंत पोहोचण्यासाठी ८५ दिवस, २० कोटीचा टप्पा ओलांडण्यासाठी पुन्हा ४५ दिवस आणि ३० कोटींपर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा २९ दिवस लागले.
देशाला ४० कोटी लसीकरण होण्यास पुन्हा २४ दिवस लागले आणि त्यानंतर दि. ६ ऑगस्ट रोजी ५० कोटी लसीकरण पार करण्यासाठी आणखी २० दिवस लागले. ६० कोटींचा आकडा पार करण्यासाठी आणखी १९ दिवस आणि दि. ८ सप्टेंबरला ७० कोटींवर पोहोचण्यासाठी पुन्हा १३ दिवस लागले. या सगळ्या प्रक्रियेत लसीकरण झालेल्या लोकांना फारसा त्रास जाणवला नाही, अनेकांना केवळ अंगदुखी व ताप आला, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.