मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या लागू करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांचा काहीच परिणाम सध्या दिसून येत नाहीय. संसर्गाचे प्रमाण आणखी वाढले तर निर्बंध आणखी कडक करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा अवतार अतिशय संसर्गजन्य आहे. त्यामुळेच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दररोज जवळपास दुप्पट होत आहे. दैनंदिन वाढती रुग्णसंख्या ही काळजी करायला लावणारी आहे. राज्यात ३१ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य सरकार अद्यापही लॉकडाऊनच्या विचारात नाही, तशी वेळच येऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टन पेक्षा अधिक वाढल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल, असे डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा काही परिणाम होतो आहे किंवा नाही यावर सतत निगराणी ठेवली जाईल. जर, बाधितांची संख्या अशीच वाढत गेली तर आणखी कठोर निर्बंध केले जातील. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे. ते न केल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊन हवा आहे किंवा नाही याचा विचार सर्वांनीच करणे गरजेचे आहे. मुंबई आणि पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट हे दिवसागणिक वाढतो आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता केवळ नियमांचे पालन करावे, असे डॉ. टोपे यांनी म्हटले आहे.