नवी दिल्ली – अपघात किंवा आत्महत्या यासारख्या घटनांनंतर मानवी मृतदेहांचे पोस्टमॉर्टम केले जाते. सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हॉस्पिटल्स मध्ये पोस्टमॉर्टमची सुविधा असते. सद्यस्थितीत देवळ दिवसा म्हणजे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पोस्टमॉर्टम केले जाते. मात्र, यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी मोठी घोषणा केली आहे.
मांडविय यांनी आज एक ट्विट करुन माहिती दिली आहे की, ब्रिटीशांच्या काळापासून रुढ झालेली पद्धत बदलत आहोत. ज्या हॉस्पिटल्समध्ये सायंकाळनंतर पोस्टमॉर्टम करण्याची सुविधा उपलब्ध आहे तेथे सूर्यास्तानंतरही पोस्टमॉर्टम केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुड गव्हर्नन्स अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे मांडवीय यांनी म्हटले आहे.
का करत नाही सायंकाळनंतर पोस्टमॉर्टम
पोस्टमॉर्टम हा एक ऑपरेशन प्रकार आहे. यालाच मराठीत शवविच्छेदन असे म्हणतात. हे केल्यानंतर व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकते. पोस्टमॉर्टमसाठी मृतांच्या नातेवाईकांची संमती अनिवार्य असते. काही प्रकरणांमध्ये पोलिस अधिकारी मात्र खूनसारख्या प्रकारात पोस्टमॉर्टमला परवानगी देखील देतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६ ते १० तासांच्या आत पोस्टमॉर्टम केले जाते. कारण शवामध्ये काही कालावधीनंतर बदल घडतात.
मृतदेहांच्या पोस्टमॉर्टमची वेळ सूर्योदय ते सूर्यास्त होईपर्यंत आहे. यामागील कारण असे आहे की, रात्रीच्या वेळी ट्युबलाईट किंवा एलईडीच्या कृत्रिम प्रकाशात रक्ताचा रंग लाल ऐवजी जांभळा दिसतो आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये जांभळ्या रंगाचा उल्लेख नाही. कृत्रिम प्रकाशात वेगवेगळ्या प्रकारच्या दुखापतीमुळे पोस्टमॉर्टम अहवालास कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते.
भारतीय न्यायालयात स्वीकारलेल्या जे. सी. मोदी यांच्या ज्युरिसप्रुडन्स टॉक्सिकोलॉजी या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे रात्री पोस्टमॉर्टम न करण्यासाठी धार्मिक कारण देखील दिले गेले आहे. कारण बर्याच धर्मांमध्ये रात्रीच्या वेळी शेवटचे संस्कार केले जात नाहीत. अशा परिस्थितीत, रात्री मृत व्यक्तीचे पोस्टमॉर्टम केले जात नाही.
https://twitter.com/mansukhmandviya/status/1460214807278219266