औरंगाबाद – राज्यात पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग सर्वेक्षण करीत असून बहुतांश पालकांनी त्यास संमती दर्शविली आहे. मात्र, यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी अनुकुला दर्शविलेली नाही. ते म्हणाले की, आता शाळा सुरू करणे धोक्याचे ठरु शकते. कारण शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यांच्यासाठी सध्या लस उपलब्ध नाही. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे दूर झालेला नाही. तिसऱ्या लाटेचा धोका असताना शाळा सुरू करुन मोठी आपत्ती येऊ शकते. सध्या सुरूच करायचे असेल तर टप्प्याटप्प्याने महाविद्यालयांचा विचार होऊ शकतो. कारण, १८ वर्षे वयापुढील विद्यार्थ्यांनी लस घेतली असेल तर धोका कमी होऊ शकतो, असे डॉ. टोपे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ८५ टक्के पालकांनी शाळा पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने कल दिला आहे. त्यातच आता आरोग्यमंत्र्यांनी सावधगिरीचा सिग्नल दिला आहे. त्यामुळे सर्वेक्षणानंतरही शाळा सुरू होणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे.