विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात कोविड प्रतिबंधक लशीचा तुटवडा कायम आहे. गरज आहे तेवढ्या लशीचा पुरवठा केंद्राकडून होत नाही, मात्र लसीकरणाबाबत कसलीही तडजोड करणार नाही, बाहेरूनही लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. कोविशील्ड लशीच्या ९ लाख मात्रा आज मिळाल्या. त्या दोन दिवस पुरतील. या मात्रा ४५ वर्षांवरच्या नागरिकांना दिल्या जातील. १८ ते ४४ वर्ष वयोगटाचं लसीकरण कमी गतीनं, पण चालू ठेवावं लागेल, तरुणांनी संयम बाळगावा, असं आवाहन टोपे यांनी केलं.
कोविशील्ड च्या १३ लाख, तर कोव्हॅक्सीनच्या ४ लाख अशा एकूण १८ लाख मात्रांसाठी ऑर्डर दिली आहे. जागतिक निविदांमधून इस्रायल तसंच युरोपातल्या देशांमधून प्रतिसाद आलेला आहे. द्रवरुप प्राणवायूसाठीही देकार आलेले आहेत. त्याबद्दल निर्णय होताच माहिती दिली जाईल, असं टोपे म्हणाले. रशियाची स्पुटनिक लसही लवकरच उपलब्ध होईल. तिचे दर निश्चित झाल्यावर ऑर्डर दिली जाईल, असं ते म्हणाले.
ऑक्सीजनबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न सुरु आहेत, असं त्यांनी सांगितलं. रेमडेसीवीरही मागणीप्रमाणे अद्याप मिळत नाही. रेमडेसीवीरबाबतचे सर्व अधिकार केंद्राकडे आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांनी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या किमती वेगवगळ्या ठेवल्या आहेत. त्यावर केंद्रसरकारनं नियंत्रण ठेवावं, अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली.राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. तो आणखी वाढेल. मात्र त्यासाठी लॉकडाऊनचे नियम पाळावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.