नवी दिल्ली – देशात कोरोनारुग्णांची संख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून पाच सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांना केल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यामुळे देशातील शाळा पुन्हा सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ट्विटमध्ये ते सांगतात, या महिन्यात लशीची उपलब्धता करण्याच्या नियोजनाचा भाग म्हणून अतिरिक्त दोन कोटींहून अधिक डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांनी पाच सप्टेंबरपर्यंत लसीकरण करून घ्यावे. पाच सप्टेंबरला साजरा केल्या जणार्या शिक्षक दिनाच्या आधीच सर्व शाळेच्या शिक्षकांना लस देण्यास प्राधान्य देऊन लस देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना सर्व राज्यांना करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन करण्यापूर्वी गेल्या वर्षी मार्चमध्ये देशभरातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्व शाळा ऑनलाइन सुरू करण्यासही मान्यता दिली होती. काही राज्यांमध्ये मोठ्या वर्गांच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. देशात सध्या लसीकरणाचा आकडा ५९ कोटींच्या वर पोहोचला आहे.
बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, गेल्या २४ तासात ६१,९०,९३० लशीचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाचा आकडा ५९ कोटी (५९,५५,०४,५९३) वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत ५१.११ कोटी कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात ३४,१६९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,१७,५४,२८१ झाली आहे. बरे होण्याचा दर ९७.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे.