इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पावसाळा आला की तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. म्हणूनच ‘आला पावसाळा, आजार सांभाळा’ असं म्हटलं जातं. कोरोनापासून आपल्याला जवळपास सगळ्याच आजारांची धास्ती बसू लागली आहे. त्यामुळेच साधा सर्दी ताप देखील भीती निर्माण करतो आहे. आता पुन्हा नवनवीन आजार येताना दिसत आहेत. सध्या व्हायरल तापासोबतच डोळ्यांची साथही येताना दिसते आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात डोळ्यांची साथ येताना दिसते. मात्र, आता व्हायरल तापासोबतच डोळ्यांच्या फ्लूची वाढती प्रकरणे दिसत आहेत. घरातील जवळपास प्रत्येक सदस्याला या आजाराचा संसर्ग होताना दिसतो आहे. भारतात अचानक डोळ्यांच्या फ्लूचे रुग्ण वाढण्याचे कारण काय आहे, घरातील कोणाला त्रास होत असेल, तर काळजी कशी घ्यावी, असे अनेक प्रश्न सध्या नेत्रतज्ज्ञांना विचारले जात आहेत.
म्हणून पसरतो संसर्ग
डोळ्यांच्या फ्लूच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात संसर्गाचा धोका इतर कोणत्याही ऋतूपेक्षा जास्त असतो. हवेतील ओलाव्यामुळे जिवाणू आणि विषाणू सहजपणे तयार होतात, त्यामुळे संसर्ग झटकन होतो, असे नेत्रतज्ज्ञ सांगतात. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जुलैमध्ये जास्त पाऊस झाला. त्यामुळे दरवर्षी ऑगस्टपर्यंत जेवढे रुग्ण असतात ते यंदा जुलै महिन्यातच असतात. यंदा या विषाणूचा प्रसार झपाट्याने होताना दिसतो आहे.
कशी काळजी घ्याल?
या आजारापासून वाचण्यासाठी स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. बाहेर जाताना चष्मा घाला. संसर्गजन्य आजार असल्याने तुमचे कपडे कोणाशीही शेअर करू नका. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना शाळा, महाविद्यालय किंवा कार्यालयातून सुट्टी घेण्यास सांगा.
हे नक्की करा
संसर्ग झाल्यास डोळे दिवसातून दोनवेळा थंड पाण्याने धुवावेत. डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलेले ड्रॉप्सच डोळ्यात घालावेत. डोळ्यांसारख्या संवेदनशील अवयवाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे. अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात. व्यवस्थित काळजी घेतली तर ३ ते ५ दिवसात हा आजार बरा होऊ शकतो. मात्र एकामागून एक दोन्ही डोळ्यांना संसर्ग झाल्यास तो बरा होण्यासाठी आणखी दिवस लागू शकतात.