मुंबई – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पद भरतीसाठी 24 आणि 31 ऑक्टोबर, 2021 रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची आठ परिमंडळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संबंधित परिमंडळासाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करतील. आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
राज्य शासनाच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदासाठी 24 आणि 31 ऑक्टोबर, 2021 रोजी परीक्षा होणार आहेत. परीक्षा ‘न्यासा कम्युनिकेशन कंपनी’ मार्फत घेतली जाणार आहे. परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी आरोग्य विभागाच्या उपसंचालक अधिकारी यांची प्रत्येक परिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या परिमंडळाच्या कार्यालयास भेट द्यावी. परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात. परीक्षेच्या तयारीबाबत दररोज आढावा घ्यावा, समस्या असल्यास स्थानिक जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा, परीक्षा केंद्र व्यवस्थित आहेत का, तेथे परीक्षार्थींना आवश्यक सुविधा दिल्या गेल्या आहेत का, याबाबत तपासणी करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल जामर्स बसवले आहेत का, स्ट्रॉंग रुमची व्यवस्था झाली आहे का, कोविड विषयक नियमांची अंमलबजावणी होते का, याबाबत पाहणी करायची आहे. संबंधित कामकाज होईल याकडे लक्ष द्यायचे आहे, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.
नियुक्त अधिकारी, पद आणि त्यांना दिलेले परिमंडळ
1) डॉ. विजय डेकाटे, प्राचार्य, कुटुंब कल्याण आणि प्रशिक्षण केंद्र, पुणे – पुणे परिमंडळ
2) डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आयटीसी ब्युरो, पुणे – ठाणे परिमंडळ
3) डॉ. डी. एम. गायकवाड, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे- नाशिक
4) एम. एम. मोरे, आरोग्य सेवा (परिवहन), पुणे – कोल्हापूर
5) डॉ. सुनीता गोल्हाईत, उपसंचालक (शुश्रुषा), मुंबई – औरंगाबाद
6) डॉ. आर. एस. आडकेकर, सहसंचालक, पुणे – लातूर.
7) डॉ. उमेश नावाडे, प्राचार्य, सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर – अकोला
8) डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक (नेत्र), मुंबई – नागपूर