मुंबई – राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या गट ‘ड’ संवर्गातील लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यास आज सुरुवात झाली आहे. सुमारे सव्वा तीन लाख उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतले आहे. इतर उमेदवारांनीही प्रवेश पत्र संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ अर्चना पाटील यांनी केले आहे. उमेदवारांना काही शंका अथवा समस्या असल्यास 9513315535, 7292013550 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.
आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या रविवारी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबत डॉ. पाटील यांनी तयारीबाबत आणि परीक्षेच्या काही मुद्यांबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी नमूद केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे न्यासा कम्युनिकेशन कंपनीस गट-क व गट-ड भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध करण्यात आले होते. या कंपनीमार्फत गट ‘क’ संवर्गाची परिक्षा २४.१०.२०२१ रोजी घेण्यात आली आहे. करारातील अटी व शर्तीनुसार प्रश्नपत्रिका संच गोपनीयरित्या कंपनीस हस्तांतरण करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची होती. इतर सर्व जबाबदारी कंपनीची आहे.
गट ड संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील ३४६२ पदे भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ४,६१,४९७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त असून १३६४ केंद्रांवर परीक्षा आयोजन करण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आरोग्य विभागाने कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य केले आहे. कंपनीने केलेल्या सर्व कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी यांची दैनंदिन आढावा बैठक व्हीसीद्वारे दररोज घेण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने परिक्षा केंद्रांचे आरक्षण, समावेक्षकांचे प्रशिक्षण, प्रवेश पत्र वाटप याबाबतचा दैनंदिन आढावा घेण्यात येत होता. कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. विभागातील सर्व मंडळ व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देत आहेत.
बैठक व्यवस्थेबाबतचे निकष
- परीक्षेचे आयोजन करताना प्रत्येक जिल्हा स्वतंत्र विभाग म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यांतर्गत असणारी कार्यालये आणि त्यांचेअंतर्गत असणारे संवर्गाकरिता एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
- सर्व कार्यालयांसाठी आणि सर्व संवर्गांसाठी एकत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्ह्यांमधून परिक्षेस बसता येणार आहे.
- अर्ज करतेवेळेस उमेदवारांना पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला होता. किती जिल्ह्यांना अर्ज करावा यावर बंधन घालण्यात आले नव्हते. यामुळे उमेदवारांनी अनेक जिल्ह्यांसाठी अर्ज केलेले आहेत.
- अर्ज केलेल्या सर्व जिल्ह्यांसाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये उमेदवार परीक्षेस बसतील त्याच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी मध्ये उमेदवाराचा विचार केला जाईल. इतर जिल्ह्यांमध्ये विचार केला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना जाहिरातीमध्ये करण्यात आली होती.
- उमेदवारांनी ज्या जिल्ह्यांमध्ये अर्ज केलेले आहेत अशा जिल्ह्यांमध्ये त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. कदाचित त्यांचे रहिवाशी जिल्ह्यांमध्ये नसल्यामुळे उमेदवारांना ती गैरसोयीच वाटत आहे. उमेदवारांनी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केल्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये परिक्षेकरिता उपस्थित रहावे असा संभ्रम झाला असण्याची शक्यता आहे.
- २६.१०.२०२१ पासून उमेदवारांना गट ड संवर्गाचे प्रवेश पत्र प्राप्त करुन घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेशपत्र कसे प्राप्त करावे, याचे प्रात्यक्षिक संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. २८.१०.२०२१ पासून सर्व उमेदवारांना त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करुन देणे बाबत कंपनीस सूचित करण्यात आले आहे.
- उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्या जिल्ह्यात अर्ज केला असेल त्या जिल्ह्यात आपणांस प्रवेश पत्र देण्यात आले आहे. आपण जास्त जिल्ह्यांकरिता अर्ज केला असेल तर आपणांस सोयीस्कर वाटेल अशा परिक्षा केंद्रावरुन परिक्षा द्यावी.
- परीक्षा केंद्राचे आरक्षण, समावेक्षकांचे प्रशिक्षण, कोविड नियमावलीनुसार आसनव्यवस्था, परिक्षा कक्षातील जॅमर व्यवस्था आदी सुविधा परिक्षा सुरळीत पार पाडण्याकरिता विभागामार्फत कंपनीस सूचना देण्यात आलेल्या आहेत.
- परीक्षेसंदर्भात कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये तसेच प्रलोभनास बळी पडू नये. कोणत्याही अडचणी संदर्भात 9513315535, 7292013550 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण
– एका उमेदवाराने एकच फॉर्म भरला आहे व ३३ प्रवेशपत्र कंपनीद्वारे देण्यात आलेली आहेत : संबंधित उमेदवाराने ३३ जिल्ह्यांसाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांना ३३ प्रवेशपत्रे देण्यात आलेली आहेत. उमेदवाराने किती जिल्ह्यांकरिता अर्ज भरावेत यासाठी विभागामार्फत कोणतेही बंधन घालण्यात आले नव्हते. परंतु परीक्षा मात्र एकाच जिल्ह्याकरिता देता येईल. परीक्षा कोठे द्यायची याबाबतचा निर्णय सर्वस्वी उमेदवाराने घ्यावयाचा आहे.
– काही उमेदवारांनी ३० जिल्ह्यांकरिता अर्ज केलेले आहेत
– अर्ज किती जिल्ह्यांना करावयाचा, परीक्षा एकाचा सत्रात घेण्यात येईल, उमेदवार ज्या जिल्ह्यांमधून परीक्षा देण्यात येईल त्याच जिल्ह्यांमध्ये उमेदवाराचा विचार करण्यात येईल अशा सूचना विभागामार्फत जाहिरातीद्वारे देण्यात आलेल्या आहेत.