ठाणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – शरीर तंदुरुस्त व निरोगी ठेवण्यासाठी, आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आवश्यक आहे. नियमित शारीरिक हालचालींमुळे लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग, मानसिक आजार, मधुमेह आणि संधिवात यासारख्या गंभीर समस्यांपासून संरक्षण होऊ शकते. त्यासाठी योगा-व्यायाम यांचा नित्यक्रमात समावेश करणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, जर आपण दररोज सायकल चालवण्याची सवय लावली तर, बैठी जीवनशैलीशी संबंधित आरोग्य समस्यांचा धोका अनेक पटींनी कमी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत, प्रत्येकजण नियमितपणे सायकल चालवण्याचे आरोग्य फायदे घेऊ शकतो.
सायकलिंगच्या आरोग्य आणि पर्यावरणीय फायद्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी दि. ३ जून रोजी जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. सायकल चालवण्याची सवय आनंददायी, किफायतशीर आणि पर्यावरणासाठीही फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याची सवय अनेक आजारांपासून वाचवण्यासही मदत करते.
सायकलिंग ही प्रामुख्याने एरोबिक क्रिया आहे, याचा अर्थ ते सहजपणे हृदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसांचे व्यायाम करते. ज्या लोकांचे वजन जास्त आहे त्यांच्यासाठी सायकल चालवणे हा एक चांगला व्यायाम असू शकतो. एका अभ्यासानुसार, सुमारे अर्धा तास सायकल चालवल्याने २१०ते ३११ कॅलरीज बर्न होतात, जे अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
तसेच २० ते ३० वयोगटातील ३० हजार नागरिकांसह १४ वर्षांहून अधिक काळ केलेल्या डॅनिश अभ्यासात असे आढळून आले की, नियमितपणे सायकल चालवतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. या सवयीमुळे हृदयरोग-लठ्ठपणाचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी होतो.
सायकल चालवल्याने तणाव कमी होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सायकल चालवणे हे ध्यान आणि आनंददायी असू शकते, तसेच बाहेर फिरणे आणि निसर्गाच्या जवळ असणे मनःशांती देते. याशिवाय, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, मूड योग्य ठेवण्यासाठी आणि तणावग्रस्त मनाला शांत करण्यासाठी सायकलिंग उपयुक्त आहे. मानसिक आरोग्यासाठी हा विशेषतः फायदेशीर सराव आहे.
नियमित सायकल चालवण्याचे इतरही अनेक प्रकारचे आरोग्य फायदे आहेत. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती वाढते. स्नायूंची ताकद आणि लवचिकता सुधारते. तणाव पातळी कमी करण्यात आणि मुद्रा समन्वय सुधारण्यास मदत होते. तसेच हाडे मजबूत होतात तसेच शरीरातील चरबीचे प्रमाणही कमी होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.