नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नाशिक भेट टळली असली तरी अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये त्यांची दहशत मात्र दरम्यानच्या काळात कायम होती त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य संस्थांमध्ये आपापली ड्युटी सांभाळण्याची सतर्कता पाळली गेली.
मुंडे चार दिवस मुक्कामी येणार असल्याचा निरोप जिल्हा परिषद अन जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत पोहचविण्यात आला होता. मुंडे यांची धडाकेबाज कामकाजपद्धती संपूर्ण राज्याला ज्ञात असल्याने नाशिकमधील अधिकाऱ्यांना हुडहुडी भरली होती. जिल्हा शल्यचित्सक अशोक थोरात यांनी पत्रक काढून मुख्यालयी थांबण्याचे निर्देश साऱ्याच आरोग्य कर्मचायांना दिले होते. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही कामाला लागला. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याठिकामी भेटी देण्यात आल्या होत्या आणि कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या.दुसरीकडे जिल्हा शासकीय रुग्णालय असो कि प्राथमिक आरोग्य केंद्रे या साऱ्याच ठिकाणी स्वच्छता करण्यात आली होती.
खरे तर मुंडे येणार असल्याच्या नुसत्या बातमीने सारीच आरोग्य यंत्रणा कामाला लागली.
मुख्यालयी न राहणारे कर्मचारी ऐन थंडीत नियुक्तीच्या ठिकाणी जाऊन पोहचले. दोन दिवसांच्या काळात कोणीही मुख्यालयी सोडले नाही. मुंडे यांनी महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केलेले असल्याने त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी, याबाबत ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी पालिकेतील अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मुंडे हे अचानक भेट देतील म्हणूनच त्याच्या दौर्याविषयी अधिकृत कळविण्यात आले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. पण प्रत्यक्षात मुंडे काही आलेच नाही. असे असले तरीही दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर का होईना, ग्रामीण भागातील आरोग्य संस्था चकाचक झाल्या अन मुख्यालयी राहण्याचा अनुभवही काही जणांना घेणे भाग पडले.
Health Commissioner Tukaram Mundhe Nashik Visit