नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ते येणार असल्याच्या नुसत्या वार्तेनेच साऱ्यांनाच घाम फुटला…बऱ्याच जणांनी मुख्यालय गाठत रात्र अक्षरशः जागून काढली… त्यांच्या नावाची दहशतच एवढी की ते नेमके येणार कधी, याची वेळोवेळी खबरबात घेतली जात होती… राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रस्तावित दौऱ्याने नाशिक जिल्ह्यातील अख्खी आरोग्य यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र शुक्रवारी दिवसभर दिसून आले.
मुंढे एक सनदी अधिकारी असले तरी त्यांचा धसका केवळ सरकारी अधिकारीच नाही तर राजकारण्यांमध्येही आहे. त्यामुळेच की काय मुंढे यांना जवळ करणारे राजकारणीही क्वचितच आढळून येतात. कर्तव्य कठोर मानले जाणारे मुंढे यांनी काही काळ नाशिक महापालिकेचे आयुक्तपद भूषविले असल्याने इथल्या यंत्रणेला त्यांच्या कामकाजाची पद्धत चांगलीच ठाऊक आहे. कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्यास थेट जागेवरच निलंबित करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी वचक होता.
मुंढे सध्या नाशिकमध्ये कार्यरत नसले तरी त्यांची दहशत अद्यापही सरकारी कर्मचायांमध्ये कायम असल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्याचे झाले असे की मुढे सध्या आरोग्य विभागाचे आयुक्त आहेत. दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आपण नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात दौरा करणार असल्याचे जाहीर केले. आता ते नेमके कधी येणार हे मात्र अधिकृत त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले नव्हते. पण तरीही नाशिक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अख्खा दिवस चक्क दहशतीत काढला. साहेब रात्री-अपरात्री अचानक भेट देतील म्हणून मुख्यालयी न राहणारे थेट मुख्यालयी रवाना झाले. गणवेश अन शर्टाच्या खिशावर नावाची पाटी लाऊन साहेबांची वक्रदृष्टी आपल्यावर पडणार नाही याची खबरदारीही घेण्यात आली.
केवळ जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग नाही तर जिल्हा शासकीय रुग्णालयातही मुंडे यांच्या दौऱ्याचा धसका घेण्यात आला होता. या मुख्यालयांबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय अशा ग्रामीण भागातील ठिकाणीही स्वच्छता ठेवण्यात आली होती. सायंकाळी कामकाजाच्या वेळेत साहेब नाशिकमध्ये पोहचले का, याचा कानोसा घेतला जात होता. नांदगाव, मालेगाव, चांदवड, निफाड अशा ठिकाणांहून विचारणा करणारे भ्रमणध्वनी खणखणत होते.
काही जण म्हणे साहेब घोटी पर्यंत आले, तर काही जण साहेब चार दिवस मुक्कामी राहणार असल्याचा अंदाज बांधत होते. पण साहेब खरोखरच येणार आहेत का अन् येणार असतील तर नेमके कधी, याची पुसटशी कल्पनाही जिल्हा शासकीय रुग्णालय अन जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना नव्हती. एकंदरीत मुंडे यांच्या नावाची दहशत पुन्हा एकदा नाशिकने अनुभवली हे मात्र खरे! एवढेच नाही तर अख्खी आरोग्य यंत्रणा कामाला लागली, हेही तितकेच खरे!
Health Commissioner Tukaram Mundhe Nashik Visit