लखनऊ (उत्तर प्रदेश) – आजच्या काळात शिक्षण घेताना कोणतेही तरुण-तरुणी हे स्वतःची आवड आणि करिअर मधील संधी या दोन्हींचा विचार करतात. परंतु काही वेळा आवड वेगळीच असते आणि करिअरमधील संधी वेगळ्याच ठिकाणी मिळते. त्यामुळे नेमके काय करावे, अशी द्विधा मनस्थिती होऊ शकते. सहाजिकच आवड असलेल्या क्षेत्रात जाण्याचा विचार अनेक जण करतात. परंतु एखादे करिअर निवडले असते, त्यामध्ये अधिक पैसा आणि संधी असते, त्यामुळे ते निर्णय बदलू शकत नाही. मात्र एखादा तरुण चांगल्या पगाराची नोकरी सोडून ज्या क्षेत्रात आवड आहे, अशा क्षेत्रात जातो ही गोष्ट निश्चितच आगळीवेगळी म्हणावी लागेल. किंबहुना अभिमानाची यासाठी म्हणावे लागेल की, त्या तरुणाने देशाची सेवा करण्याचे म्हणजेच लष्कराचे क्षेत्र निवडले आहे जाणून घेऊ या तरुणाच्या याविषयी…
मुंडाळी गावात राहणाऱ्या अरुण पुंडीर यांना बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी आवडत नव्हती. त्यांनी सुरुवातीचे २० लाख रुपयांचे पॅकेज सोडून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. मेहनत घेऊन त्यांनी हे स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केली. तांत्रिक प्रवेशाद्वारे त्यांची लष्करात लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. त्याचा क्रमांक पाचवा आहे.
विशेष म्हणजे अरुणने आपल्या करिअरला दिशा देण्यासाठी आव्हानांचा सामना केला पण त्याने संयम सोडला नाही. त्यांचे अपंग वडील प्रदीप पुंडिर हे १८ वर्षांपासून कोमात आहेत. आई सुधा पुंडीर यांचा आधार मिळण्याआधीच सन २०१६ मध्ये एका रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. सुधा या अंगणवाडी सेविका होत्या.
अरुणने आपले प्राथमिक शिक्षण ट्रान्सलेम स्कूलमधून पूर्ण केले. त्यांनी मेरठ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून २०१७ ते २१ मध्ये बीटेक कॉम्प्युटर सायन्स केले. तसेच शिक्षण पूर्ण करण्याआधीच त्याला नोएडातील एका आयटी कंपनीत २० लाखांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरी मिळाली, पण त्याने ही नोकरी सोडून सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. अरुणने जुलै ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत वर्क फ्रॉम होम येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले.
अभिमानाची गोष्ट म्हणजे अरुणचे सुरुवातीपासूनच लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न होते. तर अरुणचा मोठा भाऊ अभिषेकही सैन्य भरतीची तयारी करत आहे. अरुणचे मामा सुरेंद्र सिंह हे सुभेदार मेजर म्हणून निवृत्त झाले आहेत, त्यांनी अरूणला एसएसबी मुलाखतीसाठी मार्गदर्शन केले.