नाशिक – डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी हैद्राबाद येथे जायचे असल्याने संवाद यात्रेचा हा दौरा चार दिवस पुढे ढकलण्याची विनंती जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी केली होती. त्यानुसार मी त्यांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी जाण्याची परवानगी देखील दिली होती. मात्र दौऱ्यात कोणताही बदल न झाल्याने रवींद्र पगार यांनी उपचार अर्धवट सोडत हैद्राबाद येथून माघारी फिरले आणि दौऱ्याचे नियोजन केले. अशा प्रकराच्या निष्ठावान व हाडाच्या कार्यकर्त्यांची आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला गरज असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी पगार यांचे कौतुक केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक येथील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विविध प्रश्नांवर मत मांडले. ते म्हणाले की, देशात अनेक संस्थांचे खाजगीकरण होताना दिसत आहे. जे ६० – ७० वर्षात तयार करण्यात आले ते विकण्याचे काम मोदीसरकार करत आहे. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही.आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. आणि त्या निवडणुकीत जास्त जागा जिंकून आणू त्यावेळी ही लढाई संपेल असा विश्वास
पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळसाहेबांनी अभ्यास करून मंत्रीमंडळात मांडणी केली आहे. आज ओबीसी आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. इम्पिरिकल डेटाची मागणी करुनही केंद्रसरकार टाळाटाळ करत आहे यावरुन हे सरकार ओबीसीविरोधात किती आहे हे लक्षात येते असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
ईडीचा गैरवापर करण्यात आला त्याचं उदाहरण भुजबळसाहेब आहेत. भुजबळसाहेबांना महाराष्ट्र सदन प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे असेही जयंत पाटील म्हणाले. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका कळावी यादृष्टीने ही परिवार संवाद यात्रा असल्याची माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली.
पक्षाची प्रगती करायची असेल तर २८८ मतदारसंघापर्यत गेले पाहिजे. या मतदारसंघात निवडणूक लढवली की नाही यापेक्षा कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे माझं काम आहे असेही जयंत पाटील म्हणाले. बर्यासच ठिकाणी कार्यकर्त्यांनी मौलिक सूचना केल्या आहेत. त्याचा विचार पक्ष नक्की करेल. सरकारची कर्जमाफी व भुजबळसाहेबांची शिवभोजन थाळी लोकप्रिय झाली आहे. गरीबातील गरीब माणसाचे किती आकर्षण या योजनेकडे आहे हे लक्षात येते. सरकारने ज्या योजना केल्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पक्षाचे मेळावे घेऊन प्रबोधन करणारी टिम तयार करण्यात आली आहे. ती टिम मार्गदर्शन करेल. बुथ कमिट्यांची रचना तळागाळात पोचवण्याची गरज आहे.
पवार साहेब हे आपलं पावर सेंटर
पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा या आमदारकीचा पाया आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश प्राप्त करुया असे आवाहन करत प्रत्येक ठिकाणी आपली शक्ती उभी करायची आहे. आपण स्वतःची ताकद उभी करा ज्यामुळे आपण आपल्या ताकदीवर निवडून येऊ असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच या वयातही इतका त्रास असतांना सातत्याने काम करणाऱ्या पवार साहेबांच्या कामाकडे बघून आपल्याला अधिक ऊर्जा मिळते. पवार साहेब हे आपलं पावर सेंटर असल्याचे सांगत आयटी टेक्नॉलॉजीचा वापर पक्षीय कामकाजात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्कृष्ठ रित्या कामकाज केलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी आपले विचार मांडले.
या संवाद यात्रेला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, पक्षाचे कोषाध्यक्ष व माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी खासदार देविदास पिंगळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, माजी आमदार जयवंत जाधव, शहर जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शेफाली भुजबळ, अर्जुन टिळे, आमदार नितीन पवार, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, शहराध्यक्ष अंबादास खैरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.