नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – आपली एखादी महत्त्वाची गोष्ट हरवली की, ती शोधण्यासाठी आपण खूप कासाविस होतो किंवा अस्वस्थ होतो. परंतु ती वस्तू जर एखाद्या कठीण ठिकाणी हरवली तर त्याचा शोध घेणे देखील अशक्य असते. त्याचप्रमाणे गवताच्या मोठ्या गंजीतून सुई शोधणे, डोक्यावरील काळयाभोर दाट केसातून एखादा पांढरा केस शोधणे किंवा आकाशगंगेमधून एखादा महत्त्वाचा तारा शोधणे जितके कठीण आहे.
तितकेच कठीण आता आपली महत्त्वाची गोष्ट शोधणे होय. अशीच आपली महत्त्वाची गोष्ट शोधण्याची वेळ ब्रिटनमधील एका व्यक्तीवर आली आहे. आता ती वस्तू शोधणे त्याला अत्यंत कठीण जात आहे. परंतु त्याची जिद्द आणि चिकाटी पाहता ती वस्तू त्याला नक्कीच मिळेल असे वाटते. ब्रिटनमध्ये, जेम्स हॉवेल नावाचा माणूस 2013 मध्ये न्यूपोर्टमधील कचराकुंडीत टाकलेल्या त्याच्या हार्ड ड्राइव्हचा शोध घेत आहे. या हार्ड ड्राइव्हमध्ये 2,638 कोटी रुपयांचे एकूण 7,500 बिटकॉइन्स आहेत. जेम्स यांनी शोधासाठी एकूण 36 तज्ज्ञांची संपूर्ण टीम गुंतवली आहे, त्यात यूएस स्पेस एजन्सी नासाची सेवा देणारी फर्म आहे.
हार्ड ड्राईव्ह शोधण्यासाठी लाखो टन कचरा जमिनीतून खणून काढावा लागणार असून त्यामुळे प्रादेशिक प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. मात्र आता जेम्स याला न्यूपोर्टमध्ये त्याच्या हार्ड ड्राइव्हस् शोधण्यासाठी प्रादेशिक प्रशासनासह अनेक कायदेशीर करार देखील करावे लागतील. परंतु त्याने सांगितले की, याबाबत त्याला कोणतीही घाई नाही, कारण जोपर्यंत सिटी कौन्सिल परवानगी देत नाही तोपर्यंत काहीही शोधणे शक्य नाही. या बिटकॉइन्सची किंमत 100 दशलक्ष डॉलर्सच्या जवळपास असू शकते. त्यामुळे जेम्सला खात्री आहे की, अनेक कंपन्या समुद्राच्या तळातून खजिना उत्खनन करतात येथे तर फक्त जमिनीवर कचरा आणि माती खोदण्याचे काम असून त्यामानाने हार्ड डिस्क शोधणे खूप सोपे आहे. त्याकरिता नगर परिषदेची परवानगी तसेच पर्यावरण आणि कायदेतज्ज्ञांचीही मदत घेत आहेत.
विशेष म्हणजे या हार्ड डिस्क शोधात ऑन ट्रॅक कंपनीची सेवा घेण्यात आली असून, या कंपनीने नासासाठीही काम केले आहे. त्यांच्या मते, जेम्सची हार्ड ड्राइव्ह तुटलेली नसेल तर ती सापडण्याची सुमारे 85 टक्के शक्यता असते. दुसरीकडे या मोहिमेमुळे पर्यावरणाची हानी होण्याची भीती आहे. मात्र हार्ड डिस्क सापडली पण खराब झाली असेल तर बिटकॉइन्स काढणे शक्य होणार नाही, मग जेम्स खर्च करत असलेल्या पैशाची भरपाई कशी करणार? मात्र, जेम्सच्या म्हणण्यानुसार ते कायदेशीर कराराद्वारे ते सोडवण्यास तयार आहेत. तसेच त्यासाठी क्ष-किरणांपासून ते अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत 125 वर्षे जुन्या शोधाचा वापर करणार असल्याचे सांगण्यात येते.