मनीष कुलकर्णी, मुंबई
एचडीएफसी लिमिटेड बँकेचे विलिनीकरण एचडीएफसी बँकेत करण्याचा प्रस्ताव असून, त्याचा दोन्ही बँकांसह त्यांच्या ग्राहकांना फायदा होणार आहे. विलिनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या एका संयुक्त बँकेच्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा एकाच मंचावर मिळणार आहेत.
एचडीएफसी लिमिटेड ही गृहनिर्माणासाठी अर्थसहाय्य करणारी कंपनी आहे. त्यामुळे ती फक्त गृहकर्ज देते. इतर बँकिंग सेवांसाठी ग्राहकांना इतर बँकांवर अवलंबून राहावे लागते. एचडीएफसी लिमिडेट समुह एक कंपनी असल्यामुळे एचडीएफसी बँक गृहकर्ज सेवा देत नाही. त्यामुळे ग्राहकांना गृहकर्जासाठी इतर बँकांकडे जावे लागते. विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एचडीएफसी लिमिडेट आणि एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना एकाच मंचावर गृहकर्ज, वाहन कर्ज, खासगी कर्ज, किरकोळ कर्जासह सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा मिळणार आहेत.
विलिनीकरणाची घोषणा झाल्यानंतर एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले, की विलिनीकरण पूर्ण झाल्यानंतर नव्या युनिटचा संयुक्त ताळेबंद १७.८७ लाख कोटी रुपये आणि एकूण मालमत्ता ३.३ लाख कोटी रुपये असेल. एचडीएफसी-एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणामुळे एचडीएफसी लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांवर कोणताच परिणाम होणार नाही. या विलिनीकरणामुळे ग्राहक, कर्मचारी आणि शेअरधारकांसह सर्व हितचिंतकांचा दीर्घकाळ नफा होणार आहे.
प्रस्तावित करारांतर्गत एचडीएफसी लिमिटेडच्या प्रत्येक २५ इक्विटी शेअर्ससाठी एचडीएफसी बँकेचे ४२ इक्विटी शेअर मिळतील. एचडीएफसीकडे एकूण ६.२३ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर एचडीएफसी बँकेकडे १९.२८ लाख कोटींची मालमत्ता आहे. एचडीएफसी बँकेला ६.८ कोटींचा मोठा ग्राहकांचा आधार आहे.
विलिनीकरणानंतर स्थापन होणारी संयुक्त कंपनी मार्केट कॅपनुसार देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी होणार आहे. संयुक्त कंपनीचा मार्केट कॅप १४ लाख कोटींपेक्षा अधिक असेल. टाटा कंसल्टेन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) लाही ही कंपनी मागेल टाकेल. आता टीसीएसचा मार्केट कॅप १३.८० लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. १८ लाख कोटींच्या मार्केट कॅपसह आता रिलायन्स इंडस्ट्रिज सर्वोच्च स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर टीसीएस आहे.
विलिनीकरणाच्या घोषणेनंतर एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी १० टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. दिवसभराच्या व्यवसायानंतर एचडीएफसी बँकेचे शेअर ९.९७ टक्क्यांच्या उसळीसह १६५६.४५ रुपयांवर आणि एचडीएफसी लिमिटेडचे शेअर ९.३० टक्क्यांच्या उसळीसह २६७८.९० रुपयांवर बंद झाले. एचडीएफसी असेट मॅनेजमेंट या समुह कंपनीचे शेअर ३.३८ टक्क्यांच्या गतीसह २३५२.२५ वर बंद झाले.