मुंबई – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा झटका दिला आहे. ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल रिझर्व्ह बँकेने घेतली आहे. त्यामुळेच एचडीएफसी बँकेला सेवा सुधारण्याचे बजावले आहे. विद्यमान ग्राहकांना जोपर्यंत दर्जेदार सुविधा प्राप्त होत नाही तोपर्यंत नव्या योजनांना रिझर्व्ह बँकेने रोखले आहे. त्यामुळेच एचडीएफसी बँकेच्या ऑनलाईन नव्या योजना आणि नवे क्रेडीट कार्ड वाटप यास लगाम लागला आहे.
हा आदेश तात्पुरता असला तरी एचडीएफसी बँकेला गेल्या दोन वर्षात तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने झटका दिला आहे. एचडीएफसीचे देशभरात कोट्यवधी ग्राहक आहेत. इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, मोबाईल अॅप यासह अनेक सुविधांची सेवा चांगली मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे येत आहेत. एचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळविल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एचडीएफसीने नवे मोबाईल अॅप आणले आहे. मात्र, त्यात अनेक अडचणी येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बँकेला आता जुने मोबाईल अॅप पुन्हा सेवेत आणावे लागते की काय, अशी चिन्हे आहेत.