मुंबई – हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)ने गृह कर्जाच्या व्याजदरात ०.५ टक्के कपात केली आहे. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत एचडीएफसीने म्हटले आहे की, हाऊसिंग लोनवर एडजेस्टेबल रेट होम लोन्स (एआरएचएल) बेंचमार्क असलेल्या कर्जावर ०.५ टक्के कपात केली आहे. ही कपात ४ मार्चपासून अर्थात आजपासून लागू होणार आहे. यानंतर एचडीएफसीचा एआरएचएल १६.०५ टक्के होईल.
एचडीएफसीच्या आधी स्टेट बँक आफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेने काही दिवसांपूर्वी गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. अर्थात एसबीआय आणि कोटकची व्याजदर कपात मर्यादित काळासाठी आहे.
एसबीआयने सोमवारी गृहकर्जातील व्याजदरात पहिलेपासून असलेली सूट आणखी काही दिवसांसाठी वाढविली आहे. आता ही बँक ६.७० टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. परंतु, ३१ मार्चपर्यंतच ही सुविधा असेल. यातील प्रोसेसिंग शुल्कही बँकेने शंभर टक्के माफ केले आहे.
एसबीआय होम लोनवरील व्याजदराशी सिबील स्कोअर लिंक करण्यात आला आहे. बँक ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरच ६.७० टक्के व्याजदर देत आहे. तर त्यावरील मागणी असल्यास ६.७५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
कोटक महिंद्राने ०.१० टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. ३१ मार्चपर्यंत ६.६५ टक्के व्याजदराने गृह कर्ज वितरित केले जाईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.