नंदुरबार – प्रख्यात कीर्तनकार प्रख्यात कीर्तनकार हभप ताजोद्दीन शेख महाराज (वय ५६) यांचे कीर्तन करत असतानाच निधन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सोमारी (२७ सप्टेंबर) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान त्यांचे साक्री तालुक्यातील जामदे येथील माळमाथा परिसरात ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सुरू होते. त्याचवेळी त्यांच्या छातीत दुखू लागले. ते व्यासपीठावरच खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या भाविकांनी तत्काळ त्यांना शनिमांडळ येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाल्याने नंदुरबार मधील खासगी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
अतिशय हुशार आणि वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून त्यांची ओळख होती. हिंदू धर्माचे पालन करताना त्यांनी मोठा प्रचार-प्रसार केला. अनेक राज्यांमध्ये त्यांची कीर्तने होत असत. त्यांचे अनेक कीर्तन भाविकांच्या आजही स्मरणात आहेत. त्यामुळेच त्यांचा मठा चाहता वर्ग आहे. त्यांनी मराठी वाडमय आणि संत साहित्यावर पीएचडीही केली होती. ते औरंगाबाद येथे राहत असत. त्यांनी काही काळ प्राध्यापकाचीही नोकरी केली होती. अतिशय रसाळ भाषेत ते कीर्तन करीत असत. वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा त्यांनी गावोगावी पोहचवली. संतांचे विचार आणि धार्मिक ग्रंथांमधील अनेक संदर्भ त्यांचे तोंडपाठ होते. ग्रामीण भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. कीर्तन करणे (म्हणजेच ईश्वरभक्ती) करीत असतानाच त्यांना मृत्यूने गाठल्याने त्यांना खऱ्या अर्थाने मोक्ष मिळाला आहे आणि त्यांच्या आजवरच्या कार्याचा तो परिपाक असल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.