विशेष प्रतिनिधी, मुंबई
जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिन या लशीला मान्यता मिळालेली नाही, त्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये कामानिमित्त प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोविशिल्ड लस घेण्याकडे जास्तीत जास्त लोकांचा कल आहे. पण आता कोविशिल्डच्या बाबतीतही काही अडचणी पुढे आल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
देशभरात कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. देशात जास्तीत जास्त लोकांना कोविशिल्ड लस दिले जात आहे. मात्र विदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी चिंता निर्माण करणारी एक बाब पुढे आली आहे. कारण अनेक देशांनी कोविशिल्डला परवानगी दिलेली नाही.
युरोपमधील देशांनी कोविशिल्ड घेतलेल्या नागरिकांना देशात प्रवेश देणार नाही, असा फतवाच काढलेला आहे. युरोपमधील अनेक देशांनी डिजीटल लस पासपोर्ट जारी करायला सुरुवात केली आहे. हे विशेषतः युरोपमधील लोकांना कामासाठी किंवा पर्यटनासाठी स्वतंत्ररित्या ये–जा करण्याची परवानगी देणारे पासपोर्ट असेल.
लस पासपोर्टच्या माध्यमातून तुमचे लसीकरण झाले आहे आणि तुमच्यापासून संक्रमणाचा धोका नाही, याची ग्वाही मिळणार आहे. सुरुवातीला हे पासपोर्ट देताना कोणती लस घेतली आहे, याची अट राहणार नाही, असे युरोपीय संघाने स्पष्ट केले होते. मात्र ग्रीन पासच्या नावावर उभे करण्यात आलेले तांत्रिक मुद्दे आता कोविशिल्डसाठी अडचणीचे ठरू लागले आहेत. त्यामुळे युरोपमध्ये गेलेले भातीयच नव्हे तर अनेक विदेशी नागरिकांनाही या अडचणीचा सामना करावा लागत आहे.