इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एलआयसी पॉलिसीमध्ये चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी २४२ लोकांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणात तक्रारदाराने म्हटले आहे की, काही लोकांनी फोनवर स्वत:ला एलआयसीचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर एलआयसीच्या काही पॉलिसींची माहिती दिली आणि त्यात चांगल्या रिटर्न्सचे आश्वासन दिले आणि ८.५० लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या आरोपींना दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. आरोपी सन २०१६ पासून फसवणूक करत होते. आरोपींकडून मोबाईल फोन, सिमकार्ड, वॉकी टॉकी, १.८१ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. चौकशीनंतर सर्वांची सोमवारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य दोन फरारांचा शोध सुरू आहे.
सायबर पोलिस स्टेशनचे प्रभारी बसंत यांनी सांगितले की, अटक केलेल्या सर्व आरोपींनी दिल्लीतील जनकपुरी जिल्हा मध्यवर्ती भागात कॉल सेंटर उघडले होते. एलआयसी एजंट्सकडून एलआयसी पॉलिसीधारकांची माहिती गोळा करुन फसवण्यासाठी त्या माहितीचा वापर केल्याचे समोर आले आहे. हे आरोपी स्वत:ची ओळख एलआयसी अधिकारी म्हणून देत होते.
सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी बसंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अशोक, शान आणि अमित हे मुख्य आरोपी आहेत. तो आरोपी रवींद्र नावाच्या माणसाच्या बँक खात्यात पॉलिसीधारकांचे पैसे जमा करत असे. लोकांना एलआयसीच्या नावाखाली विश्वासात घेऊन देशभरात २४२ लोकांची फसवणूक केली आहे. यातील आठ प्रकरणे हरियाणातील आहेत. त्यांच्याकडून मोबाईल फोन, सिमकार्ड, वॉकी टॉकीज, १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.